Home Political आळंदी नगरपरिषद निवडणूक : प्रभाग ७ मध्ये मतदारांचा संमिश्र कौल; शिवसेनेच्या अरुणा...

आळंदी नगरपरिषद निवडणूक : प्रभाग ७ मध्ये मतदारांचा संमिश्र कौल; शिवसेनेच्या अरुणा घुंडरे विजयी,भाजपचे सुनील घुंडरे यांचा विक्रमी फरकाने विजय…

दिनेश कुऱ्हाडे 

   उपसंपादक 

आळंदी :‌ आळंदी नगरपरिषद निवडणुकीतील प्रभाग क्रमांक ७ मध्ये मतदारांनी दिलेल्या कौलामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. महिला व खुल्या अशा दोन्ही जागांसाठी झालेल्या लढतीत शिवसेना आणि भाजपला प्रत्येकी एक जागा मिळाली.

           महिला जागेवर शिवसेनेच्या अरुणा घुंडरे यांनी संयमित पण ठोस विजय मिळवला, तर खुल्या जागेवर भाजपचे सुनील घुंडरे यांनी तब्बल ७२६ मतांच्या फरकाने दणदणीत विजय नोंदवत प्रभागातील आपले वर्चस्व सिद्ध केले.

          महिला जागेसाठी झालेल्या अटीतटीच्या लढतीत अरुणा घुंडरे यांना ८८७ मते मिळाली. भाजपच्या ज्योती चिताळकर पाटील यांना ७६७ मते मिळाली. शेवटच्या फेरीनंतर निकाल स्पष्ट होताच अरुणा घुंडरे यांनी १२० मतांच्या फरकाने विजय मिळवत शिवसेनेची बाजू भक्कम केली. प्रचारात स्थानिक प्रश्न, महिला सबलीकरण आणि नागरी सुविधांचा मुद्दा केंद्रस्थानी राहिल्याचे मतदारांमध्ये दिसून आले.‌

          खुल्या जागेसाठी झालेल्या लढतीत मात्र भाजपचे सुनील घुंडरे यांनी एकतर्फी आघाडी घेतली. त्यांनी १,१९८ मते मिळवत प्रतिस्पर्धी शिवसेनेचे ज्ञानेश्वर गुळुंजकर (४७२ मते) यांचा पराभव केला. या लढतीत सुनील घुंडरे यांनी मिळवलेला ७२६ मतांचा फरक हा प्रभाग ७ मधील निवडणूक इतिहासातील लक्षवेधी ठरला आहे.

          या संमिश्र निकालामुळे प्रभाग क्रमांक ७ मध्ये घुंडरे कुटुंबातील राजकीय ताकदीचे संतुलन स्पष्ट झाले असून, निकालानंतर दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करत आनंद व्यक्त केला.