दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी : नगरपरिषद निवडणुकीतील प्रभाग क्रमांक ५ मध्ये भाजपने अभूतपूर्व वर्चस्व गाजवत दोन्ही जागांवर एकतर्फी विजय मिळवला. भाजपच्या खुशी सागर बोरुंदिया आणि संतोष रासकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांचा मोठ्या मताधिक्याने पराभव करत मतदारांचा स्पष्ट कौल आपल्या बाजूने वळवला. या निकालामुळे प्रभाग क्रमांक ५ भाजपचा बालेकिल्ला ठरल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
पहिल्या जागेसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपच्या खुशी बोरुंदिया यांना तब्बल १,७०९ मते मिळाली, तर राष्ट्रवादीच्या कांचन कुऱ्हाडे यांना अवघी ४१२ मते मिळाली. त्यामुळे खुशी बोरुंदिया या १,२९७ मतांच्या विक्रमी फरकाने विजयी झाल्या. हा मतदारांनी दिलेला विश्वासाचा मोठा कौल मानला जात आहे. दुसऱ्या जागेसाठी भाजपचे संतोष रासकर यांना १,३२६ मते मिळाली, तर राष्ट्रवादीचे रोहन कुऱ्हाडे यांना ७९३ मते मिळाली. संतोष रासकर यांनी ५३३ मतांनी विजय मिळवत प्रभागावर भाजपची दुहेरी पकड अधिक मजबूत केली.
या निकालानंतर प्रभागात भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष करत फटाके फोडून आणि घोषणा देत आनंद व्यक्त केला. माजी उपनगराध्यक्ष सागर बोरुंदिया यांचे विकासकामे, तसेच संघटनात्मक ताकद यांचा हा विजय असल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये दिसून आली.
“प्रभाग क्रमांक ५ मधील जनतेने माझ्यावर आणि भाजपवर जो प्रचंड विश्वास दाखवला, त्याबद्दल मी सर्व मतदारांची मनापासून ऋणी आहे. हा विजय माझा नसून सर्वसामान्य नागरिकांचा, कार्यकर्त्यांचा आणि पक्षाच्या संघटनाचा आहे. प्रभागातील विकासकामे, नागरी सुविधा, महिला व युवकांसाठी संधी निर्माण करणे आणि प्रत्येक नागरिकाच्या प्रश्नांना न्याय देणे, हेच माझे पहिले प्राधान्य राहील. दिलेला विश्वास कधीही व्यर्थ जाऊ देणार नाही,” असे भावनिक मनोगत खुशी बोरुंदिया यांनी व्यक्त केले.



