मुहूर्त ठरला, पण नवरदेवाचा पत्ताच नाही… — लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागली हो, आता तरी उमेदवार ठरवा…

     सुधाकर दुधे

सावली तालुका प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागली गडचिरोली – चिमूर लोकसभेसाठी 19 एप्रिल रोजी मतदानाचा मुहूर्तही ठरला. परंतु अद्यापही महायुतीसह महाविकास आघाडीचा उमेदवार मात्र ठरला नसल्याने तर्क-वितर्काना उधाण आलें आहे. एकीकडे सर्वच राजकीय पक्षांमध्ये उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू असताना दुसरीकडे मात्र प्रशासनाने प्रशासकीय पातळीवर लोकसभेच्या रणसंग्रामाला सुरुवात केली आहे.

            निवडणुक विभागाकडून निवडणुकीस आवश्यक असणाऱ्या यंत्रणेसह मनुष्यबळाची देखील जुळवाजुळव देखील सुरू केली आहे. परंतू सत्ताधारी आणि विरोधकांकडून अद्यापही उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आलेली नाही. महायुती व महाविकास आघाडीकडून अनेकजण इच्छुक आहेत. परंतू मतदार संघाचे सामाजिक चित्र पाहून उमेदवार देण्यावर महायुतीसह महाविकास आघाडीचा भर असल्याचे बोलले जात आहे.

    महाविकास आघाडीचा नवरदेव कोण?

      10 वर्षा नंतर पुन्हा आपल्या पक्षाचा खासदार निवडून आणण्यासाठी कांग्रेसने कंबर कसली असून डाँ.नामदेव किरसान या मतदारसंघात तळ ठोकून गावागावात हजेरी लावीत आहेत. त्यांच्या तुलनेत या मतदार संघात माजी आमदार डाँ.नामदेव उसेंडी यांना दोन वेळा हार पत्करावी लागली. लोकसभा क्षेत्राचा आवाका सांभाळणे यासाठी पुन्हा त्यांना सक्रिय व्हावे लागेल अशी जन सामन्यात चर्चा आहे.

        भाजपाचा उमेदवार कोण?

          महायुतीत भाजपाच्या वाट्याला असलेला हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कॅबिनेट मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्यासाठी सोडणे भाजपाला पचनी पडत नसल्याचे दिसते. प्रत्येक वेळी आमदारकीसोबत मंत्रीपदाची खुर्ची पटकावणाऱ्या ‘दिलो के राजा’ला आता खासदारकीची खुर्चीही मिळेल का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

            दुसरीकडे दोन वेळा आमदार व दोन वेळा खासदार राहिलेले अशोक नेते यावेळी विजयी हॅट्रिक करण्याचा चंग बांधून कामाला लागले आहेत.मोदींच्या लाटेत कुणी नवखा उमेदवार दिला तरी निवडून येऊ शकतो असे भाजपाला वाटते. म्हणून डाँ.मिलिंद नरोटे यांचेही नावं समोर येत असले तरी राजकीय अनुभव पाहिजे तेवढा नाही. असे राजकीय विश्लेषकात चर्चिले जात असले तरी नागरिकांतही अशीच कुजबुज सुरू आहे.

              या मतदारसंघात 16 लाख 13 हजार 96 मतदार असून यापैकी 8 लाख 12 हजार 205 पुरुष 7 लाख 99 हजार 409स्त्री ,12 तृतीयपंथी ,1 हजार 470 सेनादलातील 1 परदेशातील नागरिक असे मतदार मतदानाचा हक्क बाजाविणार आहेत 27 मार्च पर्यंत अंतिम यादी घोषित केली जाणार असून मतदाराच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. या मतदारसंघात सहा विधानसभा असून गडचिरोली जिल्ह्यात 3 ,चंद्रपूर जिल्ह्यात 2 तर गोंदिया जिल्ह्यात 1 आहे.