अबोदनागो एस.चव्हाण
अमरावती जिल्हा प्रतिनिधी..
दखल न्युज भारत
अमरावती :- अमरावती ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने मोर्शी-वरुड रोडवर गोवंशीय जनावरांची क्रूर पद्धतीने होत असलेली तस्करी उधळून लावत तीन संशयितांना ताब्यात घेतले. व सुमारे ११ लाख ९४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
गोवंशाची कत्तल व तस्करी रोखण्यासाठी पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी दिलेल्या सूचनांनुसार ही संयुक्त कारवाई करण्यात आली.

दि.२० नोव्हेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पो.उप.नि. विशाल रोकडे आपल्या पथकासह मोर्शी हद्दीत पेट्रोलिंग करीत होते.यावेळी गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की मोर्शी–वरुड रोडवरील भाईपूर फाट्याजवळ तीन चारचाकी वाहनांत म्हैस व गोवंशीय बैलांना पाय–तोंड बांधून,अत्यंत क्रूरतेने कोंबून वाहतूक सुरू आहे.
पथकाने तत्काळ छापा टाकून वाहनांची पाहणी केली असता ५ म्हशी (किंमत ₹१,१५,०००), ६ गोवंशीय बैल (किंमत ₹ ७९,०००) तसेच तीन चारचाकी वाहने (किंमत ₹.१०,००,०००) असा एकूण ₹.११,९४,०००/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पाळीव प्राणी तस्कर १) अन्सार अहमद अब्दुल जब्बार रा. पूर्णानगर,ता. भातकुली,२) अहतेशाम अहमद सुलतान अहमद,रा.वलगाव,जिल्हा अमरावती,३) शेख फारुख शेख गनी,रा.सेल्फीनगर,वरुड या ३ आरोपींना पकडण्यात आले.

जप्त जनावरे व वाहने ताब्यात घेऊन पुढील कार्यवाहीसाठी पो.स्टे.मोर्शी यांच्याकडे हस्तांतरित करण्यात आले असून तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक विशाल आनंद,अपर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत,स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण वानखडे,तसेच मोर्शी ठाणेदार राहुल आठवले यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.
पथकात स.पो.नि. राहुल गवई,पो.उप.नि.विशाल रोकडे,स.फौ.निरंजन उकंडे,संतोष तेलंग,दीपक पाल,राजेश कासोटे,मारोती वैद्य,चालक किशोर सुने व पो.हे.कॉ.उमाळे आदींचा समावेश होता.

