शासनाची जागा हडप करून पाणी जाण्याचा मार्ग बंद केल्याने नागरिकांच्या घरात घुसले पाणी… — पाणी जाण्याचा मार्ग मोकळा करून द्या.. – राजू नंदनवार

अमान क़ुरैशी

जिल्हा प्रतिनिधि 

दखल न्यूज़ भारत

       सिंदेवाही :- वासेरा या गावालगत असलेल्या शासनाच्या महसुली जागेमधून मामा तलावाचे पाणी शेतीला पुरविल्या जात होते. तसेच गावातील सांडपाणी सुद्धा याच जागे मधून वाहत असताना काशिनाथ नाकाडे हे पाटबंधारे विभागात कामाला असताना सदर जागा हडप करून पाणी जाण्याचा मार्ग बंद केल्याने नहरातून वाहणारे पाणी, गावातील वाहणारे सांडपाणी, आणि पावसाचे पाणी, नहरात साचल्याने नागरिकांच्या घरात घुसले असल्याचा आरोप तंटा मुक्त समितीचे अध्यक्ष राजू नंदनवार यांनी केला असून सदर मार्ग त्वरित खुला करून देण्याची मागणी सुद्धा केली आहे.

               गावालगत असलेली शासनाची गट क्र. ७९९ असलेली ०.३३ आर जागा पडीत अवस्थेत होती. वासेरा मामा तलावाचे भडगर मायनर सदर जागे पासून गेला असून या जागेजवळ मुंड्या पासून लघू पाटबंधारे विभागाने एक लहान वीतरिका सुद्धा याच जागे मधून काढण्यात आली होती. वरील गट क्रमांकाची जागा ही पडीत राहत असल्याने गावातील अनेक व्यक्ती या जागेवर मैदानी खेळ खेळायचे. असे जाणकार व्यक्ती सांगत आहेत. गावातील काशिनाथ नाकाडे हे लघु पाटबंधारे विभागाचे चौकीदार म्हणून कामाला असताना मायनर चे काम सुद्धा पाहत होते. तेव्हा त्यांनी वरील गट क्रमांकाच्या जागे संदर्भात माहिती काढली असता, ती जागा शासनाची आहे. असे समजताच त्यांनी तत्कालीन तलाठी यांना हाताशी घेऊन त्या जागे बाबत स्वतःचे नावाने अतिक्रमण पंजी वर नाव चढविले आणि १९९९ मध्ये ती जागा स्वतःचे नावे करून घेतली. मात्र तरीही सदर जागे मधून पाटबंधारे विभागाच्या मामा तलावाचे पाणी शेतीला जात होते. मात्र काशिनाथ नाकाडे यांचे मृत्यू नंतर त्यांचे वारसदार यांनी सदर मार्गावरून जाणारे पाणी बंद करून मोठा भरावा टाकला आणि एक लहानशी जागा पाणी जाण्यासाठी खुली ठेवली.

         त्यामुळे भडगर मायनर मधून वाहणारे तलावाचे पाणी, गावातील ७० टक्के वाहणारे सांडपाणी, आणि पावसाचे येणारे पाणी, यामुळे मायनर मध्ये अतिरिक्त पाणी साचून मायनर शेजारी असलेल्या नागरिकांच्या घरात घुसत असल्याचा आरोप नंदनवार यांनी केला आहे. वरील क्रमांकाच्या जागे मधून पाटबंधारे विभागामार्फत सिमेंट काँक्रिट मायनर चे बांधकाम करण्यासाठी साहित्य सुद्धा टाकण्यात सुद्धा आले होते. परंतु नाकाडे यांनी मायनर बांधकाम करण्यास मनाई करून आमदार वडेट्टीवार यांचेकडे तक्रार अर्ज सादर केला होता.

         त्यामुळे वडेट्टीवार यांनी कोणतीही शहानिशा न करता केवळ आपले समर्थक म्हणून सदर बांधकाम बंद करण्यास संबंधित विभागाला सांगितले. त्यामुळे सदर जागे मधून पक्के मजबुतीकरण असलेले मायनर तयार होऊ शकले नाही. वरील गट क्रमांकाची जागा ही शासकीय जागा असताना ती जागा हडप करून गावकऱ्यांचे जाणारे पाणी बंद केले असल्याने सदर जागा पाणी जाण्यासाठी खुली करून देण्यात यावी. अशी मागणी राजू नंदनवार यांनी प्रसिध्दी माध्यमातून केली आहे.