दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
पुणे : वारीच्या पवित्र सोहळ्यात नक्षलवादाचे आरोप असलेले लोक सहभागी होत असल्याची गंभीर माहिती समोर आली आहे. हे लोक वारकरी संप्रदायात बुद्धिभेद करत असल्याचा आरोप करत, समस्त वारकरी संस्था आणि संस्थान यांच्यावतीने आयोजित पत्रकार परिषदेत बंडातात्या कराडकर यांनी राज्य सरकारला ठणकावून इशारा दिला.
“ज्या लोकांवर नक्षलवादाचे आरोप आहेत, ते वारीत सहभागी होत असून, विचारांचे गोंधळ निर्माण करत आहेत. वारकरी संप्रदायात बुद्धिभेद करणाऱ्यांविरोधात त्वरित कारवाई केली गेली नाही, तर आम्ही युवकांचा स्वतंत्र गट तयार केला आहे. हे युवक सरकारला प्रश्न विचारतील, आणि त्यावेळी सर्व जबाबदारी सरकारवर असेल,” असे स्पष्ट शब्दांत बंडातात्यांनी सांगितले.
त्याचप्रमाणे, कबीर कला मंच यांसारख्या संघटनांवरही त्यांनी टीका केली. “वारीत पुरोगामी संघटना येतात आणि संतांचा अर्धवट संदर्भ देत वारकरी संप्रदायाची बदनामी करतात. त्यांच्या खोट्या प्रचाराला आळा घालणं गरजेचं आहे,” असे मत त्यांनी व्यक्त केले.
कत्तलखाना प्रकरणावर ठाम भूमिका..
मोशीतील प्रस्तावित कत्तलखान्याच्या आरक्षणावरही कराडकरांनी संताप व्यक्त केला. “मुख्यमंत्र्यांनी जरी कत्तलखाना होणार नाही असे म्हटले असले, तरी त्याबाबत लेखी आदेश सरकारने त्वरीत काढले पाहिजे. आम्ही पंढरपूरला पोहोचण्याआधी हे आदेश निघाले नाहीत, तर संपूर्ण वारकरी संप्रदायाची भावना तीव्र होईल आणि आंदोलन अटळ आहे,” असा सजग इशारा त्यांनी दिला.
तसेच अंधश्रद्धा निर्मूलन समिती वारीत काय काम करत आहे? हाही सवाल त्यांनी उपस्थित केला.
“वारकरी संप्रदाय शांततेचा आणि भक्तीचा आहे, पण जर त्याच्या मुळावर घाव घातला जात असेल, तर आम्ही शांत बसणार नाही. वाघाच्या कातडीने वाघ होता येत नाही; तसेच, वारकरी संप्रदायात शिरून खोटं नाणं चालवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना उघडं पाडण्याची वेळ आली आहे,” असे बंडातात्यांनी ठामपणे सांगितले.



