संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी ऐतिहासिक फलटण नगरीत दाखल…

दिनेश कुऱ्हाडे

  उपसंपादक

फलटण : पांडुरंगाच्या दर्शनाची लागलेली ओढ, ज्ञानोबा माऊली तुकाराम व विठुरायाचा जयघोष आणि टाळ मृदुंगाच्या गजरात पंढरीकडे निघालेला लाखो वैष्णवांचा मेळा बुधवारी ऐतिहासिक फलटण नगरीत मुक्कामासाठी विसावला. या वेळी फलटणकरांनी भक्तिमय वातावरणात लाडक्या ज्ञानेश्वर माऊली भक्तांचे स्वागत केले. गुरुवारी हा पालखी सोहळा सातारा जिल्ह्यातील शेवटच्या मुक्कामाकरिता बरड येथे विसावणार आहे.

     तरडगाव येथील पालखी तळावरून सकाळी ६ वाजता सोहळ्याच्या प्रस्थानानंतर हा सोहळा सुरवडी येथे न्याहरी, निंभोरे येथे दुपारचे जेवण व वडजल येथे विसावा घेऊन व पालखी मार्गावरील गावोगावी झालेल्या स्वागताचा स्वीकार करून श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा लाखो विठ्ठल भक्तांसमवेत सायंकाळी फलटण शहरात दाखल झाला. या वेळी फलटण शहराच्या हद्दीवर प्रशासक तथा मुख्याधिकारी फलटण नगरपरिषद संजय गायकवाड यांनी स्वागत केले. तरडगावकरांनी जड अंतकरणाने आपल्या लाडक्या माऊलींना व लाखो वारकऱ्यांना निरोप दिल्यानंतर सोहळ्याचे सुरवडी येथे साळुंखे पाटील परिवाराच्या वतीने स्वागत करण्यात आले. या वेळी सरपंच जितेंद्र साळुंखे पाटील, उपसरपंच व सर्व सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते. तर, निंभोरे येथे खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर मित्रमंडळ व सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य ग्रामस्थ यांनी स्वागत केले. वडजल येथे ग्रामस्थांनी स्वागत केले.

     माउलींचा सोहळा शहरात दाखल झाल्यानंतर तो सगुणामातानगर (मलठण) सदगुरू हरीबुवा मंदिर, पाचबत्ती चौक या मार्गे ऐतिहासिक राम मंदिराजवळ आला. या वेळी नाईक निंबाळकर देवस्थान ट्रस्टतर्फे संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्यासह मान्यवरांनी स्वागत केले. त्यानंतर पालखी सोहळा गजानन चौक, महात्मा फुले चौक, सफाई कॉलनी, गिरवी नाकामार्गे फलटण येथील विमानतळावर मुक्कामासाठी विसावला. सर्वत्र टाळ मृदुंगाचा गजर व हरी नामाचा जयघोष व भगव्या पताका यामुळे अवघे फलटण शहर विठ्ठलमय झाल्याचे दृष्य दिसून येत होते.

      दरम्यान, गुरुवारी सकाळी फलटण येथून सकाळी सहा वाजता पालखी सोहळ्याचे प्रस्थान होणार आहे. सकाळी विडणी येथे न्याहरी, पिंप्रद येथे दुपारचे भोजन, वाजेगाव येथे विसावा घेऊन हा सोहळा सातारा जिल्ह्यातील शेवटच्या मुक्कामाला बरड येथे संध्याकाळी पाच वाजता दाखल होणार आहे. शुक्रवारी हा वैष्णवांचा मेळा दुपारी सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करणार आहे.