पं.बिरजू महाराज यांच्या नावच्या नृत्य महोत्सवामुळे राष्ट्रीय एकात्मतेस प्रोत्साहन :- कृष्णकुमार गोयल… — पं.बिरजू महाराज राष्ट्रीय पुरस्कारांचे शानदार वितरण…

 

दिनेश कुऱ्हाडे

 उपसंपादक

पुणे : नंदकिशोर कल्चरल सोसायटी व कोहिनूर ग्रुप यांच्यातर्फे देण्यात येणाऱ्या नृत्य सम्राट पं. बिरजू महाराज राष्ट्रीय पुरस्कारांचे वितरण आज सायंकाळी शानदार कार्यक्रमात करण्यात आले. मुंबईतील ज्येष्ठ कथक नर्तिका पद्मा शर्मा व आसामचे ज्येष्ठ कथक नर्तक बिपुल चंद्रदास यांना नृत्य सम्राट पं. बिरजू महाराज राष्ट्रीय पुरस्कार तर नृत्य सम्राट पं. बिरजू महाराज युवा पुरस्कार बनारसचे युवा कथक नर्तक सौरव व गौरव मिश्रा यांना प्रदान करण्यात आला.

       पुरस्कार सोहळ्यास पं.नंदकिशोर कपोते, आमदार उमा खापरे , ज्येष्ठ उद्योजक तसेच कोहिनूर ग्रुपचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, सुलभा उबाळे आदी मान्यवर उपस्थित होते. या पुरस्कारांचे हे दुसरे वर्ष होते.संदीप साकोरे, सुनील सुंकरा यांनी सूत्रसंचालन केले. मानपत्राचे वाचन किरण जावा यांनी केले.

     बुधवार, दि. २१ जून २०२३, सायंकाळी सहा ते आठ या वेळात घोले रस्त्यावरील पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक सभागृह येथे हा कार्यक्रम पार पडला.

     पं.कपोते म्हणाले, ‘ पं. बिरजूमहाराज आपल्यात नसले तरी त्यांच्या स्मृती आपल्यासोबत आहेत. शेवटच्या श्वासापर्यंत ते नृत्य शिकवत राहिले. त्यांच्या स्मृती जपण्यासाठी हा महोत्सव आणि पुरस्कार सोहळा सुरु करण्यात आला आहे.

      कृष्णकुमार गोयल म्हणाले, ‘ पुणे ही कलांची राजधानी आहे. या ठिकाणी पं. बिरजू महाराज यांच्या स्मृती जपणारा महोत्सव होतो आहे, ही महत्वपूर्ण गोष्ट आहे.डॉ.पद्मा शर्मा यांचे नृत्य क्षेत्रातील योगदान श्रेष्ठ असून त्यांचा गौरव करणे हेच भाग्य आहे.कलेचे सादरीकरण आनंद निधान असते. या महोत्सवामुळे राष्ट्रीय एकात्मता पुढे जात आहे, याचा आनंद आहे. या महोत्सवामुळे देशभरातील कलाकारांना व्यासपीठ मिळत राहील. 

      आमदार उमा खापरे म्हणाल्या, ‘ पं. बिरजू महाराज महोत्सव पिंपरी -चिंचवड मध्येही आयोजित केला गेला पाहिजे. नृत्याचे शिक्षण ही निरंतर प्रक्रिया आहे. त्यात वय आडवे येत नाही, हे पं. बिरजू महाराज, विपुल चंद्रदास , पं.कपोते यांच्याकडे पाहून लक्षात येते.पं.कपोते यांनी समर्पित जीवनातून नृत्याला वाहून घेतले आहे, ही एक पूजाच आहे.

       डॉ.पद्मा शर्मा म्हणाल्या, ‘ गुरूंनी दिलेले ज्ञान, परंपरा पुढे चालविण्याचे काम आम्ही करीत आहोत. हे कर्तव्यच आहे. सुगंधाचा प्रसार होतो, तसा नृत्याचा प्रसार झाला पाहिजे. ‘

  बिरजू महाराजांना नृत्यातून आदरांजली

     ज्येष्ठ कथक नर्तिका डॉ.पद्मा शर्मा (मुंबई), ज्येष्ठ कथक नर्तक बिपुल चंद्रदास (आसाम), युवा नर्तक सौरव- गौरव मिश्रा(बनारस) यांनी कथक नृत्यातून बिरजू महाराज यांना जणू आदरांजलीच अर्पण केली ! डॉ. पद्मा शर्मा यांनी ‘बाजी कहे ‘ ही रचना सादर केली.

     विपुल चंद्रदास यांनी बिरजू महाराज यांचे पद ‘ वर्णत छवी श्याम सुंदर ‘, परन,तिहाई ,दादरा का चलन सादर केले. सौरव गौरव यांनी युगल नृत्य सादर केले. भगवान शिव आराधना ने सुरुवात करण्यात आली. नंतर प्रसिद्ध घराण्यांच्या चिजा सादर केल्या. माखनचोरी, दादरा सादरीकरणाने मने जिंकली. पं.कपोते यांनी पं.बिरजू महाराज यांच्या तीन ताल मधील बंदिशी, बिरजू महाराजांचे भजन ‘ गोविंद गोपाल मुरारी ‘ सादर केले. या सादरीकरणाने उपस्थित भारावून गेले.