मध्यरात्री नंतर भिसीवासीय अंधारात… — विद्युत पुरवठा जाणिवपूर्वक खंडित केला जातोय? — कर्तव्यात अक्षम्य हलगर्जीपणा…

 

दखल न्यूज भारत विशेष:-

          मेघगर्जनेसह वादळी पाऊस नसताना किंवा आपत्तीजनक नैसर्गिक स्थिती नसताना मध्यरात्री नंतर भिसी येथील विद्युत पुरवठा बंद करून ठेवण्यात आला.यामुळे भिसी वीज वितरण कंपनीच्या कनिष्ठ अभियंता कार्यालयातंर्गत रात्रपाळीचे लाईनमन व हेल्पर हे केवळ झोपा काढण्यासाठी असतात काय?हा प्रश्न उपस्थित होतो आहे.

         वारंवार खंडित होणारा विद्युत पुरवठा भिसी वासीयांसाठी डोकेदुखी ठरत असून भिसीतील विज वितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता कार्यालय म्हणजे शोभेची वस्तू झाली आहे,असे आता वाटू लागले आहे.

         मौजा भिसीत व परिसरात ज्या प्रमाणात वारंवार विद्युत पुरवठा खंडित केला जातो त्यावरुन हे लक्षात येते की भिसी येथील वीज वितरण कंपनीच्या कनिष्ठ कार्यालयातंर्गत कर्तव्यावर असलेले कनिष्ठ अभियंता,लाईनमन,हेल्पर हे ग्राहकांच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर नाहीत किंवा त्यांना कर्तव्य दक्षते अंतर्गत ग्राहकांची काळजी नाही.

           मोठ्या प्रमाणात विद्युत पुरवठा खंडित होणारा परिसर म्हणजे भिसी कनिष्ठ अभियंता कार्यालयातंर्गत क्षेत्र!,म्हणूनच या भागात कर्तव्यावर असलेले कर्मचारी कामचुकारपणा करतात काय? याकडे गांभीर्याने वरिष्ठांनी लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे.

      तद्वतच भिसी वीज वितरण कंपनीच्या कनिष्ठ अभियंता कार्यालयातंर्गत जाणिवपूर्वक विद्युत पुरवठा खंडित करुन ठेवला जातो काय?की यामागे अजून दुसरे गंभीर कारण आहे,या अनुषंगाने कार्यालयीन सखोल चौकशी होणे आवश्यक आहे.

        मात्र,विद्युत पुरवठा खंडतेचा भिसी व भिसी परिसरातील नागरिकांना वारंवार होणारा नाहक त्रास कमालीचा वेदनादायक आहे या संबंधातील वास्तव चंद्रपूर जिल्ह्याचे संबंधित अधिक्षक अभियंता व कार्यकारी अभियंता लक्षात घेतील काय?