महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना मोठ्या मताधिक्यासाठी प्रयत्नशील राहा :- हर्षवर्धन पाटील… — नीरा नरसिंहपूर येथे हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते भाजपच्या प्रचाराचा शुभारंभ…

 बाळासाहेब सुतार

निरा नरसिंहपुर प्रतिनिधी

              भाजपचे केंद्रीय व राज्यातील नेतृत्व आपल्या पाठीशी आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदींना तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान करणेसाठी बारामती लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना मोठे मताधिक्य मिळवून देण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी प्रयत्नशील राहावे, असे आवाहन राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, माजी मंत्री, भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी शनिवारी (दि.20) केले. 

             श्री क्षेत्र नीरा नरसिंहपूर (ता. इंदापूर) येथे हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या भाजपच्या प्रचाराचा शुभारंभ हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते उत्साही वातावरणात व भाजप कार्यकर्त्यांच्या मोठ्या गर्दीत नारळ फोडून करण्यात आला. सदर प्रसंगी हर्षवर्धन पाटील यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

        ते पुढे म्हणाले, सन 1952 पासून निवडणूक प्रचाराचा शुभारंभ नरसिंहपूर येथून करण्याची परंपरा आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे श्री लक्ष्मी-नृसिंह हे कुलदैवत आहे. श्री लक्ष्मी-नृसिंहाचे आशीर्वाद आपले व महायुतीच्या पाठीशी असल्याने उमेदवार सुनेत्रा पवार यांना इंदापूर तालुक्यातील मोठे मताधिक्य निश्चितपणे मिळेल.

               ते पुढे म्हणाले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्याशी अनेक बैठका होऊन राष्ट्रवादीशी असलेले मतभेद संपुष्टात आले आहेत. त्यामुळे आता अजितदादा पवार यांची संघर्ष राहिलेला नाही. राजकारणामध्ये आपण विश्वासार्हता निर्माण केली आहे. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे, निष्ठेने व दिलेला शब्द पाळून उमेदवार सुनेत्रा पवार यांना मोठे मताधिक्य द्यावे.

             इंदापूर तालुक्यातील विविध विकास कामासंदर्भात मतदान झाल्यानंतर आचारसंहिता संपताच बैठक होईल, त्यामुळे गावो-गावाचे विकासासाठी निधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी निधीबाबत चिंता करू नये.

       पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत देश जगात सक्षमपणे पुढे येत आहे, त्यामुळे नरेंद्र मोदी यांना साथ देण्यासाठी सुनेत्रा पवार यांना लोकसभेत पाठवा, असे आवाहनही भाषणात हर्षवर्धन पाटील यांनी केले. 

        याप्रसंगी मारुती वनवे, उदयसिंह पाटील, विलास ताटे-देशमुख, संतोष मोरे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी दत्ताभाऊ ताटे-देशमुख, मनोज पाटील, अमरसिंह पाटील, किरण पाटील, घोगरे संचालक, संजय बोडके,निलेश बोडके,आणा पाटील,धनंजय कोरटकर, विकास पाटील, कमाल जमादार, रणजीत वाघमोडे, विठ्ठल घोगरे, गोरख शिंदे, आबासाहेब शिंगाडे, कैलास कदम, विक्रम कोरटकर, रणजीत गिरमे, सचिन सावंत, शंकर घोगरे, नामदेव घोगरे, जगदीश सुतार, दशरथ राऊत, गुरुदत्त गोसावी, अभिमन्यू पावसे, शहाजी पावसे, स्वप्नील रावण, उमेश घोडके प्रशांत बाधले, डॉ अरुण वैद्य आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन ऋषिकेश दळवे तर आभार नाथाजी मोहिते यांनी मानले. प्रचार शुभारंभ सभेपूर्वी हर्षवर्धन पाटील यांनी श्री नृसिंहाची महापूजा केली. या पूजेचे पौराहित्य कमलेश डिंगरे व भैय्या दंडवते यांनी केले.

चौकट

इंदापूर तालुक्याला वाढीव पाण्यासाठी प्रयत्न – हर्षवर्धन पाटील

             इंदापूर तालुक्यातील शेतकरी सुजलाम सुफलाम होण्यासाठी आणखी सुमारे 10 टीएमसी पाण्याची गरज आहे. केंद्र व राज्यातील नेतृत्व तालुक्याचे पाठीशी आहे. त्यामुळे 10 टीएमसी पाणी उपलब्ध करून देण्यासाठी लागणारा निधी मिळण्यास काहीही अडचण येणार नाही. तसेच सत्ता आपल्या पाठीशी असल्याने आगामी काळात इंदापूर तालुक्याच्या इतर अनेक विकास कामासंदर्भात कोणतीही अडचण येणार नाही, अशी स्पष्ट ग्वाही यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी दिली.

चौकट

 हर्षवर्धन पाटील यांनी शनिवारी घेतल्या 6 सभा!

         नीरा नरसिंहपूर येथे भाजपच्या प्रचाराची शुभारंभ सभा सकाळी पार पडली. या सभेनंतर पिंपरी बु., लाखेवाडी, निरवांगी, कळंब, कळस येथे शनिवारी दिवसभरात हर्षवर्धन पाटील यांनी महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी सभा घेतल्या. या सभांना पुणे जिल्हा भाजप युवा मोर्चाच्या अध्यक्षा अंकिता पाटील-ठाकरे, तालुकाध्यक्ष अँड.शरद जामदार, भाजपचे गावोगावचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. या सर्व सभा उत्साहात व भाजप कार्यकर्त्यांच्या मोठ्या गर्दीत संपन्न झाल्या.