राजेंद्र रामटेके
विशेष प्रतिनिधी
सिरोंचा :- गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी निर्वाचन क्षेत्रात मोबाईल नेटवर्क व इंटरनेट सुविधेचा अभाव असल्यामुळे नागरिकांना अत्यावश्यक सेवांसाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः एलपीजी गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी ऑनलाईन नोंदणी व ओटीपी प्रक्रिया अनिवार्य असल्याने ग्रामीण व आदिवासी भागातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेत्या श्रीमती भाग्यश्रीताई आत्राम (हलगेकर )यांनी उप जिल्हाधिकारी यांच्याशी भ्रमध्वनी द्वारे संवाद साधून दुर्गम भागात ऑफलाइन पद्धतीने LPG सिलेंडर वाटप सुरू करण्याची मागणी केली आहे.
गडचिरोली जिल्ह्यात अनेक गावांमध्ये अजूनही मोबाईल टॉवर किंवा इंटरनेट सेवा उपलब्ध नाही. त्यामुळे नागरिकांना सिलेंडर मिळवण्यासाठी५०ते ७० किलोमीटरपर्यंत तालुका मुख्यालयात जावे लागते. मात्र, तेथेही इंटरनेट सेवा खंडित असल्यास नागरिकांना आर्थिक दंड व मानसिक त्रास सहन करावा लागतो.
या पार्श्वभूमीवर, दुर्गम भागात ऑनलाईन प्रक्रियेऐवजी ऑफलाईन पद्धतीने गॅस सिलेंडर वितरण करावे, जेणेकरून नागरिकांची गैरसोय टळेल, अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच, जिल्ह्यातील पेट्रोल व डिझेल पंपांवर इंधनाचा शिल्लक साठा दर्शविणारा तक्ता अनिवार्यपणे लावावा, अशीही मागणी करण्यात आली आहे. यामुळे ग्रामीण भागातील नागरिक व शेतकऱ्यांची अनावश्यक धावपळ टळेल, असेही त्यांनी नमूद केले.
दुर्गम भागातील नागरिकांच्या अडचणी लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने तातडीने यावर योग्य तो निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
स्मार्ट मीटर लावण्यास बळजबरीचा विरोध – भाग्यश्रीताई आत्राम यांची तीव्र प्रतिक्रिया
गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामीण भागात महावितरण विभागाकडून स्मार्ट मीटर बसविण्याचे काम सुरू असून, याला नागरिकांकडून मोठा विरोध होत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट चे नेत्या भाग्यश्रीताई आत्राम यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
भाग्यश्रीताई आत्राम म्हणाल्या की,
“ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांना अद्यापही स्थिर वीजपुरवठा, मोबाईल नेटवर्क आणि इंटरनेट सुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाहीत. अशा परिस्थितीत स्मार्ट मीटरसारखी ऑनलाईन प्रणाली बळजबरीने लागू करणे हे अन्यायकारक आहे. नागरिकांना त्याबाबत योग्य माहिती देण्यात आलेली नाही, तसेच अनेक ठिकाणी तांत्रिक अडचणी निर्माण होत आहेत.”
त्या पुढे म्हणाल्या, “महावितरण विभागाने स्मार्ट मीटर लावण्यापूर्वी नागरिकांचा विश्वास संपादन करणे गरजेचे आहे. मात्र सध्या काही ठिकाणी नागरिकांच्या इच्छेविरुद्ध मीटर बसविले जात आहेत, ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. आम्ही अशा बळजबरीचा तीव्र निषेध करतो.”
तसेच,“जोपर्यंत ग्रामीण भागातील मूलभूत सुविधा सुधारल्या जात नाहीत आणि नागरिकांच्या शंकांचे समाधान होत नाही, तोपर्यंत स्मार्ट मीटर योजना सक्तीने राबवू नये. अन्यथा नागरिकांच्या हक्कासाठी आंदोलन उभारले जाईल,” असा इशाराही त्यांनी दिला.
ग्रामीण भागातील नागरिकांच्या अडचणी लक्षात घेऊन शासनाने या विषयावर संवेदनशीलपणे निर्णय घ्यावा, अशी मागणीही भाग्यश्रीताई आत्राम यांनी केली आहे.



