Home Maharashtra आरोग्यासाठी नैसर्गिक शेती करणारा शेतकरी महत्त्वाचा :- कृषिमंत्री दत्तात्रय भरणे… —...

आरोग्यासाठी नैसर्गिक शेती करणारा शेतकरी महत्त्वाचा :- कृषिमंत्री दत्तात्रय भरणे… — नैसर्गिक शेती परिषदेत राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे प्रतिपादन…

 बाळासाहेब सुतार 

निरा नरसिंहपुर प्रतिनिधी

आपल्या देशात रासायनिक शेतीमुळे मानवी आरोग्याचे गंभीर आव्हान उभे राहिले आहे. त्या आव्हानाला तोंड देण्यासाठी नैसर्गिक शेती हा प्रभावी पर्याय असून, पुढील पिढ्यांचे आरोग्य जपण्यासाठी प्रत्येक कुटुंबाला फॅमिली डॉक्टरपेक्षाही नैसर्गिक शेती करणारा शेतकरी अधिक गरजेचा ठरेल, असे प्रतिपादन राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी केले.

         शिवाजीनगर येथील कृषी महाविद्यालयात आयोजित एकदिवसीय नैसर्गिक शेती परिषदेच्या उद्घाटना वेळी ते बोलत होते. या वेळी राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आणि कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी उपस्थित होते. कृषी राज्यपाल म्हणाले की, संयुक्त राष्ट्रांच्या अहवालानुसार रासायनिक शेतीमुळे भविष्यात गंभीर परिणाम घडू शकतात.

       जमिनीतले सूक्ष्मजीव पोषक घटक रोपांपर्यंत पोहोचवतात, पण रासायनिक शेतीत हे सूक्ष्मजीव नष्ट होत असल्याने जमिनीचा पोत बदलतो. अन्नातील पोषक घटक कमी होतात. युरियामधील नायट्रोजनमुळे नायट्रस ऑक्साइड तयार होत असल्याने कॅन्सरसारख्या रोगांमध्ये वाढ होत आहे. यापासून मुक्तता नैसर्गिक शेतीच देऊ शकते.

       नैसर्गिक शेतीसाठी योग्य बियाणे निवडणे, बीजामृत प्रक्रिया, घनजीवामृताचे योग्य प्रमाणात उपयोग आणि पाण्यासोबत जीवामृत देणे, जमिनीचे आच्छादन करणे आणि बहुपीक पद्धत या पाच बाबी महत्त्वाच्या असल्याचे नमूद करून ते म्हणाले, नैसर्गिक शेतीमुळे मातीत वाढणारी गांडुळे जमिनीत १० फूट खोलपर्यंत छिद्रे तयार करतात, ज्यामुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरते. देशी गांडुळाच्या प्रजाती आपल्या आयुष्यात ४० ते ५० हजार गांडुळे तयार करतात. त्यांच्या जीवनचक्राच्या शेवटी जमिनीला १७ प्रकारचे पोषक घटक मिळतात.

       जीवामृताच्या वापरामुळे जमिनीत सूक्ष्मजीवांची संख्या वाढते. देशी गायीच्या शेणात उपयुक्त जिवाणू मोठ्या प्रमाणात असतात. शेण, गोमूत्र, गूळ, डाळीचे पीठ व मोठ्या वृक्षाखालची रसायनरहित माती मिसळून जीवामृत पाच दिवसांत तयार होते. उरलेल्या शेणापासून घनजीवामृत तयार करता येते. यामुळे उत्पादन वाढते आणि पौष्टिक अन्न मिळते.

       राज्यपाल म्हणाले की, रासायनिक शेती पद्धत पाश्चात्त्य देशांकडून आलेली आहे. एकेकाळी भारतीय जमिनीत ऑर्गनिक कार्बनची मात्रा सुमारे १.५ टक्के होती, ती आता ०.५ टक्क्यांपेक्षा कमी झाली आहे. हा घटक जमिनीच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असून तो कमी झाल्याने जमिनी पडीक पडण्याचा धोका निर्माण झाला आहे.

         तसेच रासायनिक शेती खर्चिक असल्याने शेतकरी कर्जबाजारी होत आहेत. पूर्वी शेतकरी पारंपरिक वाण टिकवत असत. ते पुन्हा टिकवले नाहीत तर परदेशी वाणांवर अवलंबून राहावे लागेल आणि त्यांची बाजारातील मनमानी वाढेल. त्यामुळे कृषी विद्यापीठांनी पारंपरिक वाणांचे अधिक संशोधन करून ते हवामानबदल व रोगांना प्रतिरोधक करण्याची गरज आहे.

        राज्यपालांनी देशी गायींच्या संगोपनातून मिळणाऱ्या दूध व दुग्धजन्य पदार्थांच्या उत्पन्नाचे महत्त्वही अधोरेखित केले. शेतकऱ्याला पिकांच्या नुकसानीपासून सावरण्यासाठी पशुपालन उत्तम जोडव्यवसाय असल्याचे सांगून पशुसंवर्धन विभागाने अधिक दूध देणाऱ्या देशी गायींचे ब्रीड विकसित करण्यासाठी अधिक संशोधन करावे, असे त्यांनी सांगितले.

         कृषिमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की, आज कृषी बाजारपेठेत उत्पादनापेक्षा गुणवत्तेला महत्त्व मिळत असल्याने शेतीत परिवर्तन करण्याची गरज आहे. शास्त्रज्ञ व कृषी विद्यापीठांनी शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीचे महत्त्व पटवून द्यावे. कृषी विभाग भविष्यात नैसर्गिक शेतीच्या प्रसारासाठी सकारात्मक काम करेल, अशी ग्वाही त्यांनी दिली. राज्यपाल महोदयांनी आपल्या गुरुकुलातील २०० एकर शेतीत नैसर्गिक शेती यशस्वीरीत्या केली असून, ते या क्षेत्रात सक्रिय भूमिका बजावत आहेत. त्यांचा अनुभव राज्यासाठी मार्गदर्शक ठरेल, असेही त्यांनी नमूद केले.

         कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी यांनी राज्यात नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्याची भूमिका मांडली. महाराष्ट्राने या दिशेने प्रयत्न सुरू केले असून नैसर्गिक शेतीचे क्षेत्र वाढविण्यासाठी अधिक प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाही त्यांनी दिली.