अन्यायग्रस्त रिंगरोड बाधीत शेतकऱ्यांच्या सदैव पाठीशी :- मा.खा.शिवाजीराव आढळराव पाटील… — मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत बैठकीचे आश्वासन देऊन शेतकऱ्यांचे उपोषण स्थगित…

दिनेश कुऱ्हाडे

उपसंपादक

पुणे : रिंगरोडच्या भूसंपादनात शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळवण्यासाठी मी व्यक्तिशः लक्ष घालणार असून या विषयी शेतकऱ्यांच्या सदैव पाठीशी असल्याची ग्वाही खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली. तसेच लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांसोबत बैठक आयोजित केली जाऊन त्यामध्ये शेतकऱ्यांचे प्रतिनिधी बोलवण्यात येईल व योग्य तोडगा काढला जाईल असे आश्वासन यावेळी बाधित शेतकरी व स्थानिक लोकप्रतिनिधींच्या बैठकीत शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिले.

        यावेळी आढळराव पाटील यांच्याशी बैठक संपन्न झाल्यानंतर राजगुरुनगर येथे उपोषणाला बसलेल्या शेतकऱ्यांशी स्थानिक नेत्यांनी चर्चा करून आढळराव पाटील यांच्या सोबत झालेल्या बैठकीचा तपशील उपोषणकर्त्यांना दिला. तदनंतर दुपारी एक वाजता माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील व प्रांताधिकारी खेड यांच्या हस्ते ज्यूस पिऊन उपोषण स्थगित केले.

        यावेळी अतुल देशमुख, भगवान पोखरकर, रामदास ठाकूर, बाळाशेठ ठाकूर, राजाराम लोखंडे, पाटीलबुवा गवारी, तुकाराम वहीले, अमोल पवार, नितीन गोरे, प्रकाश वाडेकर, विजयसिंह शिंदे, चंदन मुर्हे, बाळासाहेब चौधरी, सोमनाथ मुंगसे, राहुल थोरवे, राहुल चव्हाण, किरण मुंगसे, अमोल विरकर यांच्या समवेत विविध पक्षाचे पदाधिकारी व खेड तालुक्याच्या १२ बाधित गावातील शेतकरी उपस्थित होते.

          रिंगरोडला शेतकऱ्यांचा विरोध नाही. मात्र रिंगरोड करताना मूल्यांकन समितीने काढलेले काही चुकीचे निष्कर्ष तसेच लागू केलेल्या प्रभावक्षेत्रामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असून अतिशय कमी प्रमाणात मोबदला मिळत आहे. ही बाब बाधित शेतकरी व स्थानिक लोकप्रतिनिधींनी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या कानावर घालून याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे दाद मागण्याची आग्रही मागणी केली. याबाबत तातडीने जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी लवकरच समन्वय समितीची बैठक आयोजित करण्याबाबत चर्चा केली. तसेच मावळचे खासदार श्रीरंगआप्पा बारणे यांच्याशी दूरध्वनीहुन चर्चा करून खेड तसेच मावळ व इतर भागातील बांधितांच्या हक्कासाठी आपण एकत्रितपणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे बैठक घेण्याचे निश्चित केले.