जयजयकार हा भारत मातेचाच :– शिफूजी शौर्य भारद्वाज… — युवा संवादात शिफुजी यांनी जिंकली तरुणाईची मनं…

 

प्रितम जनबंधु

संपादक 

       साकोली :- आपण इंडिया माता की जय म्हणू शकतो का? आपल्याला भारत माता की जय हेच म्हणावे लागेल. माझ्या बलाढ्य भारत देशाच्या सार्वभौम एकतेला कुणी धक्का जरी लावला तर त्यांच्या घरात घुसून मारायची ताकद ठेवतो. यालाच प्रथम देशहित म्हणतात, असे प्रतिपादन ग्रैंडमास्टर शिफूजी शौर्य भारद्वाज यांनी साकोली येथे आयोजित वैनगंगा पांगोली खासदार सांस्कृतिक महोत्सवात केले. येथे त्यांनी युवक युवतींशी संवाद साधला.

          खासदार सांस्कृतिक महोत्सव आणि मेरी माटी मेरा देश या उपक्रमांतर्गत ग्रँड मास्टर, कमांडो ट्रेनर शिफुजी शौर्य भारद्वाज यांच्याशी तरुणांचा मुक्त संवाद आयोजित करण्यात आला होता. साकोली येथील बाजीराव करंजेकर महाविद्यालयाच्या पटांगणावर झालेला हा कार्यक्रम तरुणाईने फुलून गेला होता. 

         दीप प्रज्वलनानंतर मार्गदर्शन करताना भंडारा गोंदियाचे खा. सुनील मेंढे यांनी युवकांना आवाहन करीत, आपल्या भारत मातेच्या रक्षणासाठी जास्तीत जास्त संख्येत युवकांनी भारतीय सैन्यात दाखल व्हा, असे सांगितले. आज भारताने अख्ख्या विश्वात बलाढ्य म्हणून नवी ओळख निर्माण केली असल्याचे ते म्हणाले.

           यावेळी शिफूजी शौर्य भारद्वाज यांनी युवा, विद्यार्थ्यांशी मुक्त संवाद करीत प्रश्नांची उत्तरे दिली. राष्ट्र हित आणि सनातन धर्मावर चर्चा, भारत आणि इंडिया यातील अंतर विद्यार्थ्यांना पटवून दिले. कार्यक्रमाला भाजपा भंडारा जिल्हाध्यक्ष प्रकाश बाळबुधे, शुभांगी मेंढे, डॉ. ब्रम्हानंद करंजेकर, भाजपा तालुकाध्यक्ष प्रा. अमोल हलमारे, शहर अध्यक्ष नितीन खेडीकर, सेंदूरवाफा भाजपाचे शंकर हातझाडे यांसह वैनगंगा शिक्षण संस्थेतील शिक्षक गण हजर होते. 

        या प्रसंगी पाचशें च्या वर महाविद्यालयीन विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि पोलिस भरतीसाठी तयारी करीत असलेल्या युवक युवतींनी ग्रैंडमास्टर शीफू शौर्य भारद्वाज यांचेशी थेट संवाद साधला. प्रत्येक उत्तरांसोबत दिल्या जात असलेल्या “भारत माता की जय” च्या घोषणांनी परीसर गुंजत होता. प्रास्ताविक डॉ. ब्रम्हानंद करंजेकर यांनी केले. संचालन प्रा. प्रदीप गोमासे तर आभार प्रा. अमोल हलमारे यांनी केले.