चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या श्रमाची फलनिष्पत्ती… — गरंडा शाळेच्या बळीराजा परसबागेत पिकवला भाजीपाला…

   कमलसिंह यादव

तालुका प्रतिनिधी पारशिवनी 

पारशिवनी::-पंचायत समिती पारशिवनी अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गरंडा येथे प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना अंतर्गत निर्माण करण्यात आलेल्या बळीराजा परसबागेत चिमुकल्या विद्यार्थ्यांनी विविध भाजीपाला पिकवून शेतीच्या ज्ञाना बरोबरच पाणी व्यवस्थापन आणि भू व्यवस्थापनचे सुद्धा धडे घेत आहे.

            नवीन शैक्षणिक धोरण अंतर्गत विद्यार्थ्यांनी जीवन कौशल्ये आत्मसात करावी तसेच परिसरात उपलब्ध साधन सामुग्रीचा व नैसर्गिक संसाधनांचा उपयोग करून उत्पादक कौशल्ये विकसित करण्याचा दृष्टिकोन निर्माण व्हावा या उद्देशाने मुख्याध्यापक खुशाल कापसे आणि सहाय्यक शिक्षक ओंकार पाटील यांचे संकल्पनेतून आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या सहकार्यातून शालेय परिसरात बळीराजा परसबाग निर्माण केली.

          या परसबागेत वांगी, टोमॅटो, मिरची, सांभार, पालक, मेथी, वाल, चवळी, कांदा, लसूण या भाज्यांची लागवड करून त्याची जोपासना शिक्षक, विद्यार्थी शाळा व्यवस्थापन समिती आणि पालकांच्या साहाय्याने करीत आहे.

            या परसबागेतून निघालेला भाजीपाला शालेय पोषण आहारात नियमितपणे वापरला जातो. उपलब्ध जागेचा सुयोग्य वापर करून फुलाविलेली परसबाग शाळेच्या सौंदर्यात भर टाकत आहे. शाळेच्या परिसरातच घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत निर्माण झालेले कंपोस्ट खत या परसबागेत टाकले जात असल्यामुळे सेंद्रिय शेतीचे धडे विद्यार्थी आतापासूनच घेत आहे. 

            विशेष बाब म्हणजे सन २०२२ – २३ या मागील सत्रात उत्कृष्ट परसबाग स्पर्धेत जिल्हा स्तरावर तृतीय क्रमांक प्राप्त करणारी एकमेव जिल्हा परिषद शाळेची परसबाग ठरली होती.

           यावर्षी सुद्धा या शाळेची बळीराजा परसबाग तालुका स्तरावर प्रथम पुरस्काराची मानकरी ठरली आहे. 

            या परसबागेच्या व्यवस्थापनात अंगणवाडी सेविका, स्वयंपाकी प्रिया मेश्राम यांचे विशेष सहकार्य लाभत आहे.

             जगाचा पोशिंदा असणाऱ्या शेतकऱ्यांप्रती आदरभाव निर्माण व्हावा या उद्देशाने या परसबागेचे नाव बळीराजा परसबाग असे ठेवण्यात आले. या परसबागेची आकर्षकरित्या केलेली रचना विद्यार्थ्यांमध्ये नीटनेटकेपणा आणि सौंदर्यदृष्टी निर्माण करणारीच ठरेल.

          ओंकार पाटील 

 (सहाय्यक शिक्षक, प्रा.शाळा गरंडा तालुका पारशिवनी)