राकेश चव्हाण
तालुका प्रतिनिधी कुरखेडा
कूरखेडा/गडचिरोली
शासनाने जिल्हा परिषदेसह खाजगी शिक्षण संस्थांमध्ये सेवेत असलेल्या शिक्षकांना टीईटी अथवा सी-टी ईटी परीक्षा उत्तीर्ण करणे अनिवार्य केले आहे. यात इयत्ता पहिली ते पाचवी करिता पेपर एक व सहावी ते आठवी करिता पेपर दोन उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे.
नव्याने शिक्षक भरतांना प्राथमिक व माध्यमिक साठी हेच निकष लावले जाते. असे असताना पदोन्नतीसाठी तयार करण्यात येणाऱ्या सेवाज्येष्ठता यादी करिता केवळ टीईटी अथवा सी-टीईटी उत्तीर्ण असलेल्या शिक्षकांचा समावेश करण्यात येत आहे. यात सदर शिक्षक कोणता पेपर उत्तीर्ण आहे याचाही विचार केला जात नसल्याने ही यादी सदोष तयार होणार काय? असा प्रश्न शिक्षकांमधून उपस्थित केला जात आहे.
शासनाच्या धोरणानुसार शिक्षकांमधून पदोन्नती देण्यासाठी सेवा जेष्ठता यादी तयार करण्यात येते. परंतु, नवीन धोरणानुसार टीईटी-सीटीईटी उत्तीर्ण असणे आवश्यक केल्यामुळे शिक्षण विभागाकडून ही पात्रता परीक्षा गृहीत धरून यादी बनविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे असे सुत्राद्वारे कळले आहे. या यादीवरून शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख व उच्च श्रेणी मुख्याध्यापक आदी पदांवर पदोन्नती देण्यात येणार आहे.
परंतु ही यादी तयार करताना परीक्षा उत्तीर्ण असलेले लक्षात घेतले जात आहे. यात पेपर एक अथवा पेपर दोन पास आहे की नाही याची पडताळणी केली जात आहे की नाही या बाबतीत शिक्षकांमध्ये संभ्रम आहे. ही माहिती शिक्षकांना नसल्यामुळे पात्रता पूर्ण शिक्षकालाच पदोन्नती मिळणार की नाही? अनेक शिक्षकांनी पहिल्याच टप्प्यात सदर परीक्षा उत्तीर्ण केली. काही शिक्षकांची एक तर काही शिक्षकांची दोन्ही पेपर निघाले.
ज्यांचे पेपर दोन्ही निघाले आहेत त्या शिक्षकांना संधी मिळाली तर सदर पदाला न्याय देऊ शकतात. परंतु, ज्या शिक्षकांचे पेपर एक निघाले आहे त्या शिक्षकांना जर पदोन्नती मिळाली तर सदर शिक्षक त्या पदाला न्याय देऊ शकणार काय? असाही प्रश्न काही शिक्षकांकडून उपस्थित केला जात आहे.
फेब्रुवारी २०२६ मध्ये झालेली सीटीईटी परीक्षा बहुतांशी शिक्षकांनी दिलेली आहे. त्या परीक्षेची अंतिम आदर्श उत्तर सूची १२ मार्च २०२६ ला प्रसिद्ध होऊन शिक्षकांपर्यंत पोहोचलेली आहे. त्यात बहुतांशी सेवाजेष्ठ शिक्षक उत्तीर्ण होणार आहेत. सीटीईटी परीक्षेच्या गुणपत्रिका येत्या ८ दिवसांच्या आत शिक्षकांपर्यंत पोहोचणार आहेत.
या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होणाऱ्या सेवाजेष्ठ शिक्षकांचा पदोन्नती प्रक्रियेमध्ये समावेश होणे क्रमप्राप्त असतांना अतिशय धाईगडबडीत पदोन्नती प्रक्रिया पार पाडण्याची भूमिका शिक्षण विभाग जिल्हा परिषद गडचिरोलीने घेतली असल्याने, सुट्टीकालावधीत सुद्धा फाईल अद्यावत करण्याची प्रक्रिया केल्याची चर्चा आहे. तसेच या प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक देवाणघेवाण झाल्याची उघड-उघड चर्चा गडचिरोली जिल्ह्यातील संपूर्ण शिक्षणक्षेत्रात रंगत आहे.
पदोन्नती प्रक्रियेत सेवाजेष्ठ शिक्षकांचा सहभाग करून घेण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासन आठ दिवस थांबले तर आभाळ कोसळणार काय? असाही प्रश्न उपस्थीत होतो आहे.



