Home देशविदेश शोषणमुक्तीचे राजकारण…

शोषणमुक्तीचे राजकारण…

        शोषक आणि शासक हे दोन वर्ग शोषित समाज व्यवस्था टिकविण्याचे काम करतात.समाजात गरीब ,मध्यम , श्रीमंत असे वर्ग निर्माण करतात.जातीची उतरंड निर्माण करून जातीव्यवस्था जोपासतात.समाजात धर्मांधता आणि अंधश्रद्धा निर्मितीचे कार्य करतात.

  भांडवलवादी विचाराचे लोक आर्थिक विषमता निर्माण करतात आणि मनुवादी विचाराचे लोक सामाजिक ,धार्मिक,सांस्कृतिक विषमता निर्माण करतात.म्हणजेच विषमतावादी व्यवस्था निर्माण करून ती जोपासण्याचे कार्य करतात,आणि ती व्यवस्था टिकवण्याचे राजकारण करतात,यास शोषणाचे आणि विषमतेचे राजकारण म्हणता येईल.

        शेतातील उत्पादन वस्तू निर्माण करताना आणि कारखान्यातून वस्तू निर्माण करताना मजूर आणि कामगारांच्या श्रमाचे शोषण करणे,अधिक नफा कमावणे,ग्राहकांची फसवणूक करणे,साठेबाजी,काळाबाजार,कृत्रिम टंचाई,बेकारी,कृत्रिम तेजी मंदी निर्माण करणे म्हणजे शोषणाचे राजकारण करणेच होय.

    तसेच एकसंघ समाजात अनेक जातीचे समूह ,अनेक धर्माचे जनसमूह,त्यात उच्चनीचता, श्रेष्ठ कनिष्ठता,अस्पृश्यता,सवर्ण दलित असे गट किंवा समूह करणे म्हणजे सरळ सरळ एकसंघ एकजीव समाजाचे तुकडे तुकडे करणे,त्यांच्यात एकमेकांबद्दल द्वेष ईर्षा कपट शत्रुत्व निर्माण करून एकदुसर्य सोबत भांडणे मारामाऱ्या करायला लावणे की जेणेकरून समाज हा कायमचा विघटितच असावा,फोडा झोडा आणि राज्य करा ही नीति हे धोरण म्हणजेच शोषितांचे राजकारण ,विषमतेचे राजकारण होय.

     विषमतावादी व्यवस्थेत म्हणजेच सरंजामी भांडवलदारी व्यवस्थेत शोषित आणि शोषक असे दोन वर्ग जरी असले,तरी शोषक आणि शोषित यांची प्रेरणा ही शोषणाचीच असते,या व्यवस्थेत प्रत्येक जण एकाच वेळी शोषकही असतो आणि शोषित पण असतो.जातीव्यवस्थतेत आणि वर्ग व्यवस्थेतील प्रत्येक माणूस हा शोषणाचा बळी असतो,तरी त्यास माझ्या खाली कुणी तरी असल्याचा आनंद होतो,आपल्या वरच्या जातीच्या किंवा वर्गाच्या माणसांकडून आर्थिक शोषण होते,सामाजिक गुलामी भोगावी लागते,तरी मी कुणाचा तरी मालक आहे ,ही त्याची जाणीव तीव्र असते,आणि गुलामीची जाणीव सौम्य असते.किंवा बऱ्याच वेळा आपण आर्थिक सामाजिक दृष्ट्या गुलाम आहोत याची जाणीव नसते,आणि असली तर ती गुलामी भोगण्यात धन्यता वाटते.ही मानसिकता शोषणाच्या राजकारणातून निर्माण केली जाते.

     विषमतेची व्यवस्था नष्ट करून समतेची व्यवस्था आणायची असेल तर आधी ” मालकी अधिकार ,आणि गुलामी मानसिकता नष्ट करावी लागेल.प्रत्येकाची शोषणतेची प्रेरणा एकमेकास कशी घातक आहे, कशी त्रासदायक आहे,ती कशी झोप उडविते हे प्रत्येकास सांगावे पटवावे लागेल.आपल्या गुलामीचे दुःखाचे कारण आपण करीत असलेले शोषण आणि आपले होत असलेले शोषण ,म्हणजेच शोषणाच्या चक्रात आपण ,( शोषित शोषक ) कसे अडकलो आहोत,यामुळेच समाजात आणि आपल्या कुटुंबात दुःख आहे.ते कसे? ते प्रत्येकास समजून सांगावे लागेल.

    कोण कुणास सांगायचे ? तर ज्यांना समता म्हणजे काय ? शोषणमुक्त समाज म्हणजे काय ,? याचा अभ्यास ज्यांना ज्यांना झाला आहे,त्यांनी शोषणमुक्त माणूस आणि समाज म्हणजे काय ? हे सांगावे लागेल.नव्हे शोषणाचे राजकारण आहे ,तर शोषणमुक्तीचे राजकारण करावे लागेल.शोषण म्हणजे काय ? त्यामागची प्रेरणा कोणती ? तिचे दुष्परिणाम काय ? हे सांगावे लागेल.शोषणातून विषमता कशी निर्माण होते ,? आणि विषमतेचे व्यक्तीवर कुटुंबावर समाजावर देशावर कोणते दुष्परिणाम होतात ,? माणूस माणसाचा कसा दुश्मन होतो ? शोषणातून आर्थिक वर्ग कसे निर्माण होतात ? सामाजिक वर्ग कसे निर्माण होतात,धार्मिक सांस्कृतिक अंधश्रद्धा कशा निर्माण होतात ,,,? याचे प्रबोधन करणे गरजेचे असते.प्रबोधन सोबतच शोषणमुक्तीचे राजकारण करणे पण जरुरीचे आहे.शोषणमुक्तीचे राजकारण म्हणजेच शोषितविचारांचे खच्चीकरण करणे होय.शोषित विचार कसे घातक आहेत.त्यातून विषमतेचा विशवृक्ष कसा वाढतो ? हे सांगणे म्हणजेच शोषणाचा भांडभोड करणे,म्हणजेच शोषितांचे राजकारण होय.हे केलेच पाहिजे,त्याशिवाय आज माणूस एकमेकांचे शोषण करण्यास टपून बसला आहे,हे बंद होणार नाही.

      लेखक : दत्ता तुमवाड

        सत्यशोधक समाज नांदेड

दिनांक : 16 जानेवारी 2026.फोन : 9420912209.