तरुणांनो, स्वतःची जबाबदारी ओळखा :-शिफुजी — शिफुजींनी जागविला तरुणाईत देशभक्तीचा हुंकार….. — तरुणांच्या असंख्य प्रश्नांना दिमाखदार शैलीत उत्तरे…..

प्रितम जनबंधु

संपादक 

        भंडारा :- युवकांनो स्वतःला ओळखा. दुसऱ्यांकडे बोट दाखवण्याऐवजी स्वतःची क्षमता ओळखून आपण काय करू शकतो, हे समजून वागा. मातृभूमीचे कर्ज आमच्यावर आहे. ते फेडण्यासाठी हजार वेळा जन्म घ्यावे लागले तरी चालेल पण शेवट याच मातीत व्हावा, अशी इच्छा म्हणजेच मातृभूमी प्रती असलेला खरा अभिमान, स्वाभिमान असल्याचे स्पष्ट मत ग्रँडमास्टर शिफुजी शौर्य भारद्वाज यांनी व्यक्त केले. विशेष म्हणजे या कार्यक्रमात तरुण-तरुणींनी शिफुजी यांच्यासोबत मुक्त संवाद साधून मनातील शंकांना वाट मोकळी करून दिली. प्रश्नांची उत्तरे देताना शिफुजी यांनीही बिनधास्त मत मांडले.

           खासदार सांस्कृतिक महोत्सव आणि मेरी माटी मेरा देश, मिट्टी को नमन आणि वीरों को वंदन उपक्रमांतर्गत प्रख्यात कमांडो ट्रेनर, ग्रँडमास्टर शिफुजी शौर्य भारद्वाज यांच्या युवा संवाद या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 

             महाविद्यालयीन युवक, युवतींकरिता आयोजित हा कार्यक्रम एक वेगळी छाप सोडून गेला. एरवी भाषण आणि उद्बोधन अशा पठडीत पहायला मिळणारा कार्यक्रम यावेळी मात्र दुतर्फी संवादातून फुलला आणि विविध विषयांवरील अनेक प्रश्नांचा उलगडा यात झाला. यावेळी मंचावर जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, पोलीस अधीक्षक लोहित मतानी, ज. मु. पटेल महाविद्यालयाचे प्रा. कार्तिक पनिकर, शुभांगी मेंढे, प्रसन्ना पालांदूरकर, सुभेदार मेजर कटरे, उपस्थित होते. 

          दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाल्यानंतर खासदार सुनील मेंढे यांनी प्रास्ताविक करताना कार्यक्रम आयोजनाची भूमिका स्पष्ट केली. आज देश जगाचे नेतृत्व करण्याची क्षमता ठेवून आहे. जी-20 परिषदेच्या निमित्ताने मिळालेला सकारात्मक प्रतिसाद या स्वप्नपूर्तीच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल असल्याचे सांगतानाच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परिवर्तन, विकास आणि जनकल्याण काय असते, हे त्यांच्या कृतीतून दाखवून दिल्याचे ते म्हणाले. युवा हा देशाचा आधारस्तंभ आहे तो मजबूत आणि सुदृढ व्हावा यासाठी पंतप्रधानांचे निर्णय महत्त्वपूर्ण असल्याचे सांगताना अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून युवकांमध्ये देशभक्ती निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे ते म्हणाले.

            हजारोच्या संख्येत उपस्थित युवक युवती आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी संवाद साधताना शिफुजी शौर्य भारद्वाज यांनी आपले अनेक अनुभव सांगितले. तरुणांनी तरुणांसारखे वागले पाहिजे. मोठेपणाचा आव आणू नये. चुका केल्याच पाहिजेत मात्र त्या संविधाना नुसार असाव्यात. आज मातृभूमीचे ऋण आमच्यावर आहे. ते फेडण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे. मला जे योग्य वाटते, तेच करायला हवे. कोण काय करतो, त्या विषयी बोलण्याचा कुणालाही अधिकार नाही असेही त्यांनी सांगितले. माणसाने शिकत राहिले पाहिजे मात्र शिकताना लढणेही तेवढेच गरजेचे आहे असेही शिफुजी म्हणाले. भारत आणि इंडिया या नावासंदर्भात सुरू असलेल्या चर्चांवरून त्यांनी भारत नावाला विरोध करणाऱ्यांचा समाचार घेतला. भारताचा उल्लेख वेदांमध्ये आहे. इंग्रजांनी जे आमचे मूळ होते, तेच बदलून आघात करण्याचा प्रयत्न केला. भारत ही आमची माता आहे. ज्याला वाटते त्यांनी इंडिया म्हणावे मात्र भारत नावाला विरोध करणाऱ्यांनी जरा एकदा स्वतःच्या अस्तित्वाची ओळख स्वतःलाच विचारावी,असेही ते म्हणाले.

             परिवर्तन घडवून आणायचे असेल तर स्वतः पुढे या. मरणासन्न अवस्थेतील लोकांची दखल कुणीही घेत नाही. जिवंत व्हा, स्वतःचे अस्तित्व दाखवून द्या आणि स्वतःची जबाबदारी ओळखा अशा शब्दात शिफुजींनी तरुणांशी संवाद साधला. विविध महाविद्यालय, शाळांमधील युवक युवतींनी अनेक प्रश्नांचा भडीमार त्यांच्यावर केला. मात्र आपल्या दिमाखदार आणि एका जवानाला साजेल अशा शैलित त्यांनी सर्वच प्रश्नांची अत्यंत समर्पक अशी उत्तरे दिली. दोन तास चाललेल्या या संवादात तरुणाई पूर्णपणे खिळून होती. सभागृहातील वातावरण देशभक्तीने न्हाऊन निघाले होते. या कार्यक्रमाचे संचालन चैतन्य उमाळकर यांनी केले.