दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी : शहरातील वाढती वाहतूक कोंडी आणि अनियंत्रित पार्किंगच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी आळंदी नगरपरिषद, आळंदी पोलीस स्टेशन आणि दिघी-आळंदी वाहतूक पोलीस शाखा यांनी संयुक्तपणे पुढाकार घेतला आहे.
विशेषतः पद्मावती रोड परिसरातील धर्मशाळा व मंगल कार्यालयांबाहेर होणाऱ्या अव्यवस्थित पार्किंगमुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याने प्रशासनाने आता कठोर पावले उचलण्याचे संकेत दिले आहेत.
या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व धर्मशाळा, मंगल कार्यालयांचे चालक, मालक आणि व्यवस्थापक यांची विशेष बैठक आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक सोमवार, दिनांक १८ मे २०२६ रोजी सकाळी ११ वाजता फुटवाले धर्मशाळा, आळंदी येथे पार पडणार आहे.
वाहतूक कोंडीमुळे रुग्णवाहिका व अन्य आपत्कालीन सेवांना अडथळा निर्माण होत असल्याच्या अनेक तक्रारी प्रशासनाकडे प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे भविष्यात कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पार्किंग व्यवस्था, स्वतंत्र आपत्कालीन मार्ग आणि वाहतूक नियंत्रण यावर सविस्तर चर्चा करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
सदर बैठकीस प्रत्येक संस्थेच्या जबाबदार प्रतिनिधीने वेळेत उपस्थित राहणे अनिवार्य करण्यात आले असून, शहरातील सुव्यवस्था आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सर्व संबंधितांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. ही सूचना आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तसेच दिघी-आळंदी वाहतूक पोलीस शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या संयुक्त विद्यमाने जारी करण्यात आली आहे.


