युवराज डोंगरे/खल्लार
“द्वेष, मत्सर, लोभ आणि तृष्णा हेच मानवी जिवनाच्या दुःखाचे व अधोगतीचे कारण असून, तथागत भगवान बुद्धांच्या कल्याणकारी शिकवणुकीतून त्यावर मात करता येते व आपले जिवन समृद्ध आणि सुंदर बनवता येते.“ असे प्रतिपादन अमरावती विद्यापीठाच्या पाली व बुध्दीझम विभागाचे प्रा.भंते एस.अनोमदस्सी यांनी केले.
स्थानिक साईनगर येथिल नालंदा बुध्द विहाराच्या बुध्दजयंती समारंभाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. नालंदा बुध्द विहाराचे नवनिर्वाचित अध्यक्ष एकनाथ वासनिक व विहाराचे माजी उपाध्यक्ष विलास मोहाडे कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून धम्ममंचावर उपस्थित होते.
तथागत भगवान गौतम बुद्ध, बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर व मातोश्री रमाईंच्या प्रतिमांना मान्यवरांच्या हस्ते पुष्पमाला अर्पण करुन कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला.
यावेळी भंते प्रा.एस.अनोमदस्सी यांच्या मंगलहस्ते विहारावरील पंचशील ध्वजारोहण करण्यात आले. पाहुण्यांचे नालंदा बुध्द विहारातर्फे पुष्पगुछ देऊन स्वागत करण्यात आले.
याप्रसंगी सामूहिक बुद्धवंदनेनंतर भंते प्रा. एस. अनोमदस्सी यांच्या मंगलवाणीतून धम्मदेशनेचा कार्यक्रम पार पडला. बुध्दतत्वज्ञान हेच मानवी जीवनाच्या कल्याणाचे मुख्य सूत्र असल्याचे प्रतिपादन व सविस्तर विवेचन भंतेंनी केले. प्रज्ञा, मैत्री, करुणा, शिल, समाधी, आर्य अष्टांगिक मार्ग, दहा पारमिता, उपपारमिता, या आणि धम्मातील मुख्य गाथावर विस्तृत विवेचन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सूरज मंडे यांनी, प्रास्ताविक नालंदाचे अध्यक्ष एकनाथ वासनिक यांनी तर आभारप्रदर्शन नालंदाचे उपाध्यक्ष आणि कवी पद्माकर मांडवधरे यांनी केले. कार्यक्रमाला डॉ.बाबासाहेब आंबेडकर अध्ययन मंचाचे आजी-माजी पदाधिकारी व कार्यकारणी सदस्य, मातोश्री रमाई महिला मंडळाच्या आजी-माजी पदाधिकारी व कार्यकारणी सदस्य, आणि नालंदा परिवाराशी सलग्न असलेल्या परिसरातील उपासक, उपासिका व बौध्द तसेच इतर समाज बांधवांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.
सामाजिक कार्यकर्ते देवा शेंडे यांच्या प्रमुख नेतृत्वात, व साईनगर परिसरातील एकूण नऊ मंडळांच्या सहकार्याने सायंकाळी निघालेल्या विराट धम्मरॅलीने बुध्दजयंती २०२५ ची सांगता झाली.



