उपक्षम रामटेके
मुख्य कार्यकारी संपादक
औरंगाबाद : परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या पोलिस कोठडीतील मृत्यू प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल याचिकेवरील दुरुस्ती अर्जावर शुक्रवारी (दि. 13) सुनावणी झाली. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड प्रकाश आंबेडकर यांनी आपली बाजू मांडली.यावेळी दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकून खंडपीठाने याबाबतचा निर्णय राखून ठेवला आहे.
न्यायमूर्ती संदीपकुमार मोरे आणि न्यायमूर्ती आबासाहेब शिंदे यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली.सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूची निष्पक्ष चौकशी व्हावी, यासाठी विशेष तपास पथक (SIT) स्थापन करावे तसेच संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करावेत,अशी मागणी करत त्यांच्या आई विजया सूर्यवंशी यांनी याचिका दाखल केली आहे.त्यांच्यावतीने ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी बाजू मांडली.
प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी नोंदवलेल्या जबाबांनंतर पुढील कायदेशीर कार्यवाही कोण आणि कशा प्रकारे करावी,याबाबत कायद्यात स्पष्ट तरतूद नसल्याचे त्यांनी युक्तिवादात नमूद केले.या संदर्भात धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी राज्याचे गृहमंत्री यांना न्यायालयात बोलावण्यात यावे,अशी मागणी ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केली.
मात्र,मूळ याचिकेत ही मागणी नमूद नसल्यामुळे खंडपीठाने याचिकेत दुरुस्ती करण्यासाठी एक आठवड्याची मुदत दिली होती.त्यानुसार दुरुस्ती अर्ज दाखल करण्यात आला.अशी माहिती ॲड.प्रकाश आंबेडकर यांनी दिली.शुक्रवारी झालेल्या सुनावणीत सरकारतर्फे अमरजितसिंह गिरासे यांनी युक्तिवाद केला.दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकल्यानंतर खंडपीठाने दुरुस्ती अर्जावरील निकाल राखून ठेवला आहे.अशी माहिती ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी माध्यमांना दिली.
सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरणामुळे राज्यात मोठे पडसाद उमटले होते. आता कायदेशीर लढाईत न्यायालय काय भूमिका घेते,याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



