सिंदेवाही पोस्ट ऑफिसच्या भोंगड कारभाराने ज्येष्ठ नागरिक त्रस्त… — पोस्ट कार्यालयात कर्मचारी नसल्याचा लागला फलक… — दैनंदिन कामाचे ठरवून दिले दिवस..

 

जिल्हा प्रतिनिधि:-अमान क़ुरैशी

     दखल न्यूज़ भारत

 

सिंदेवाही :- भारतीय डाक सेवा अंतर्गत येणारी सिंदेवाही येथील डाक सेवा कर्मचारी अभावी पूर्णतः ढेपाळली असून वरिष्ठ अधिकाऱ्या कडून कोणतीही सूचना नसताना सिंदेवाही पोस्ट कार्यालयाचे प्रमुख यांनी आपल्या मनामार्जिने “कार्यालयात कर्मचारी कमतरता” असा फलक लावून कामाचे दैनंदिनी ठरवून दिली असल्याने नागरिकांना दोन वेगवेगळ्या कामासाठी दोन दिवस कार्यालयात ये जा करावी लागत असल्याने याचा मनस्ताप ज्येष्ठ नागरिकांना बसत आहे. या गंभीर प्रकाराकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्वरित लक्ष घालण्याची नागरिकांकडून मागणी होत आहे.

               सिंदेवाही पोस्ट कार्यालय यांना स्वतःची इमारत नसल्याने मागील अनेक वर्षापासून भाड्याच्या खोली मध्ये कार्यालय सुरू आहे. सध्या एका मोठ्या इमारतीमध्ये कार्यालय सुरू असून वरच्या मजल्यावर कार्यालय असल्याने इथे पायऱ्या चढताना ज्येष्ठ नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. नागरिक पोस्टाच्या विविध कामासाठी कार्यालयात गेल्यावर दिवस ठरवून दिले आहेत. त्यामुळे एका दिवशी एकच काम करावे लागते. तर पुन्हा दुसऱ्या कामासाठी दुसऱ्या दिवशी त्याच कार्यालयात जावे लागत आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.

         या कार्यालयात आधार सेडिग, साठी अनेकांना नेहमी जावे लागत आहे. परंतु कार्यालयात कर्मचारी नसल्याने सरवर नसल्याचा बहाणा सांगून नागरिकांना परत पाठविले जाते. सध्या सदर कार्यालयात कोणत्याही पोस्ट तिकीट, किंवा रेव्हेन्यू तिकीट उपलब्ध नाही. मात्र बाहेर त्याच तिकिटा बेभावाने विकत मिळत असल्याने कार्यालयावर शंका व्यक्त करण्यात येत आहे. पोस्ट कार्यालयाची डाक पेटी फुटलेली असून वीणा कुलुपाची असल्याने पत्र किंवा कोणतेही महत्वाचे लिफापे कसे टाकावे असा नागरिकांना प्रश्न निर्माण झाला आहे.

        सदर प्रतिनिधी सिंदेवाही येथील कार्यालयात भेट दिली असता कार्यालयाचे प्रमुख सुट्टीवर असल्याचे समजले. तर सावली आणि पाथरी कार्यालयाचे कर्मचारी वरील कार्यालयाचे कामकाज करीत असल्याचे दिसून आले. त्यामुळे सिंदेवाही येथील पोस्ट खात्याचा कारभार पूर्णतः ढेपाळला असून या कार्यालयाकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.