डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिन.. — नामविस्तार लढ्यात शहीद झालेल्या शहिदांना त्रिवार अभिवादन व नामविस्ताराबद्दल सर्व जनतेला मंगलमय सदिच्छा..

           “जाळले गेलो तरी..

           सोडले नाही तुला‌‌..

            “कापले गेलो तरी..

            तोडले नाही तुला…!

             आज १४ जानेवारी,

“मराठवाडा विद्यापीठ” चा नामविस्तार होऊन “डाॅ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ” असे नामांकन करण्यात आले. महापुरुषांच्या नावाने जगात अनेक वास्तू आहेत.

        नामांकनाची ही प्रथा जागतीक स्तरावर रुढ झालेलेली आहे.आपल्या भारतात देखील अनेक महापुरुषांच्या नावाने अनेक वास्तू आहेत.

       परंतू मराठवाडा विद्यापीठाला डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्यात यावे यासाठी जो लढा द्यावा लागला, प्रचंड संघर्ष करावा लागला,सामाजिक स्तरावर अत्यंत हिंसक जाती युद्ध होऊन सरकारी नामांतराच्या ठरावाला १६ वर्षे अंमलापासून रोकण्यात आले. 

         डाॅ.बाबासाहेब आंबेडकर हे केवळ भारतातीलच नव्हे तर समग्र ज्ञानजगतात अग्रणी विद्वान म्हणून मान्य असलेले व्यक्तित्व. हा नामांतराचा लढा सामाजिक परिवर्तनाची लढाई म्हणून १६ वर्षे लढला गेला.

       महापुरुषाच्या नावांने नामांतराच्या मुद्द्यावर जगातील हा एकमेव व नाविन्यपूर्ण लढा म्हणून नोंद झाली.या संघर्षांतून भारतीय समाज मनात जाती विकाराची भावना किती हिंसक आहे याचा जगातील लोकांना परिचय झाला. 

          मराठवाडा विद्यापीठाचे दोन विभाग करुन परभणी,हिंगोली,नांदेंड,लातूर जिल्ह्यासाठी एक स्वतंत्र विद्यापीठ निर्माण केले.याला ‘स्वामी रामानंदतीर्थ’ यांचे नाव देण्यात आहे.

        या नावाला सामाजिक स्तरावर कुणीही विरोध केला नाही अथवा भावनिक समर्थनही केले नाही.परंतू डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाला विरोध फारच आक्रसताळेपणाने करण्यात आला.

         हजारो वर्षांपासून जातीच्या डबक्यात सडत असलेले समाज मन किती हिंसक असते,हे मराठवाडा विद्यापीठ नामांतर लढ्याने दाखवून दिले. आंबेडकरवाद्यांच्या अनेक जीवांना शहीद व्हावे लागले.

        अनेक घरदारं अग्नीत भस्म करण्यात आले.पोचिराम कांबळे, जनार्दन मेवाडे यांना आपल्या जीवाची बाजी लावावी लागली.इतकी मोठी प्रचंड किंमत मोजून “डाॅ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ” चा नामविस्तार झालेला आहे. 

      नामविस्तार लढ्यात शहीद झालेल्या शहीदांना त्रिवार अभिवादन व नामविस्ताराबद्दल सर्व जनतेला मंगलमय सदिच्छा!..

                   शब्दांकन

              प्रशांत चव्हाण सर