कंत्राटीकरण,खाजगीकरण करणाऱ्या आणि पेन्शनचा हक्क डावलणाऱ्या सरकारला हद्दपार करण्याची गरज.:- आमदार कपिल पाटील.. — महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारतीची नागपूर विभाग सहविचार सभा.

     रामदास ठुसे

विशेष विभागीय प्रतिनिधी 

        कंत्राटीकरण,खाजगीकरण,शाळा बंद धोरण हे सरकारचं विघातक धोरण आहे. हे खूप मोठं येऊ घातलेलं अरिष्ट आहे.यातून येणाऱ्या पिढ्या नष्ट होणार आहेत.

       सामाजिक न्यायाची लढाई लढणाऱ्या महाराष्ट्रात शिक्षणाच्या मुद्द्यावर सरकारचं अक्षम्य दुर्लक्ष आहे. पेन्शनचा लढा अनेक वर्षांपासून लढल्या जात आहे.पण सरकार फक्त आश्वासनापलिकडे जात नाही.

         या सरकारची कोंडी करायची असेल तर येणाऱ्या १४ डिसेंबरपासून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा होणारा संप यशस्वी करावा लागेल. 

           शिक्षक भारतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी या संपात ताकदीने उतरावे आणि शासनाला आपली ताकद दाखवून द्यावी.शिक्षणाचं खाजगीकरण,कंत्राटीकरण करु पाहणाऱ्या सरकारला हद्दपार करण्याची गरज आहे असे प्रतिपादन आमदार कपिल पाटील यांनी केले.

            राज्यातील शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांसंदर्भात नागपूर व अमरावती विभाग शिक्षक भारती पदाधिकाऱ्यांच्या सहविचार सभेचे आयोजन नागपूर येथील लोहिया अध्ययन केंद्राच्या सभागृहात करण्यात आले होते.

           याप्रसंगी उपस्थित पदाधिकाऱ्यांना आमदार कपिल पाटील यांनी मार्गदर्शन केले.

          सहविचार सभेत प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती राज्याध्यक्ष नवनाथ गेंड,जदयूचे राज्य कार्याध्यक्ष अतुल देशमुख,कार्याध्यक्ष दिनेश खोसे,राष्ट्र सेवा दल राज्य कार्याध्यक्ष प्रा.अर्जून कोकाटे,लोहिया अध्ययन केंद्राचे संजय सहस्त्रबुद्धे,छात्रभारतीचे माजी अध्यक्ष ऍड. शरद कोकाटे,शिक्षक भारती विभागीय अध्यक्ष भाऊराव पत्रे,शिक्षक भारती राज्य उपाध्यक्ष प्रकाश ब्राम्हणकर,संजय मस्के, अमरावती विभागीय अध्यक्ष पुरुषोत्तम ठोकळ,संजय मेश्राम, गुलाबराव मौदेकर,नलिनी नागरिकर,सोमेश्वर वंजारी,जिल्हाध्यक्ष प्रविण फाळके, सुशील बन्सोड,रवींद्र पटले,पुंडलिक देशमुख,गजानन पवार आदी उपस्थित होते.

          शिक्षक भारती पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना राज्याध्यक्ष नवनाथ गेंड यांनी वस्तीशाळा शिक्षकांची जुनी सेवा,वरिष्ठ वेतनश्रेणीचा प्रश्न,प्राथमिक पदवीधर विषय शिक्षकांना सरसकट वेतनश्रेणी,पेन्शन, मुख्यालयाचा प्रश्न यासंदर्भात शिक्षक भारती वारंवार आमदार कपिल पाटील यांचे माध्यमातून पाठपुरावा करत आहे.

         सरकारचा कमी पटसंख्येच्या शाळा समूह शाळेमध्ये रूपांतरित करण्याच्या नावाखाली शाळा बंद करण्याचा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी शिक्षक भारती राज्यव्यापी आंदोलन करणार असल्याचा इशारा नवनाथ गेंड यांनी दिला.संघटनावाढीसाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे याप्रसंगी गेंड यांनी प्रतिपादन केले. 

        अतुल देशमुख,दिनेश खोसे,भाऊराव पत्रे,शरद कोकाटे यांनी सुद्धा मनोगत व्यक्त केले.

      सहविचार सभेत शिक्षक भारती नागपूर विभाग अध्यक्षपदी सुरेश डांगे यांची निवड करण्यात आली.आमदार कपिल पाटील, नवनाथ गेंड,यांनी शाल, पुस्तक आणि पुष्पगुछ देऊन सुरेश डांगे यांचे अभिनंदन केले.वर्षभरात शिक्षक पतसंस्था निवडणुकीत विजयी झालेल्या शिक्षक भारती पदाधिकाऱ्यांचा आमदार कपिल पाटील,नवनाथ गेंड यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. 

         यात प्रामुख्याने गोंदिया/भंडारा जिल्ह्यातून राज्य उपाध्यक्ष प्रकाश ब्राम्हणकर,नागपूर जिल्ह्यातून महेंद्र बनसिंगे, मंगला प्रविण फाळके,गडचिरोली जिल्ह्यातून हिरासिंग बोगा,चंद्रपूर जिल्ह्यातून विशाल वासाडे आदींचा सत्कार करण्यात आला.

          सहविचार सभेचे संचालन सुरेश डांगे यांनी केले तर प्रास्ताविक राज्य उपाध्यक्ष प्रकाश ब्राम्हणकर यांनी केले,आभार शरद काकडे यांनी मानले,सहविचार सभेला शिक्षक भारती पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.