कारच्या धडकेने दुचाकीस्वारांचा मृत्यू..

    कमलसिंह यादव

तालुका प्रतिनिधी पारशिवनी 

पारशिवनी:-

         भरधाव वेगाने येणाऱ्या चारचाकी वाहनाने दुचाकीस धडक दिली.यात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला.ही घटना पारशिवणी सावनेर रस्त्यावरील पारशिवणी येथील बँक ऑफ इंडिया समोर आज (बुधवारी) सकाळी घडली. 

          भैय्याजी उर्फ संजय यादोराव नेवारे (५०, राहणार पारशिवणी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. तर विक्रांत अनिल चकोले वय २७ वर्षे,राहणार शिवनगर, कन्हान ) असे कार चालकाचे नाव आहे. 

         संजय आपल्या एम.एच.४०,डब्लू २२८२ क्रमांकाच्या दुचाकीने बँक ऑफ इंडिया जवळ रस्ता ओलांडीत होता.अशातच करंभाड कडून येणाऱ्या एम.एच.४० सि.क्यू. ४५१२ क्रमांकाच्या कारने दुचाकीस जोरात धडक दिली.धडकेने दुचाकीस्वार घटनास्थळापासून १० फूट समोर फेकल्या गेला.यावेळी दुचाकी कारमध्ये अडकली होती.

           दुचाकी काढण्याकरिता कारचालक विक्रांतने गाडी जोरात मागे घेतली.यावेळी घटनास्थळी पडलेला संजय गाडीखाली आला व तो गाडीसोबत खेचत गेला.यात त्याला जबर मार लागला.

             ही घटना आज सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली.लागलीच घटनेची माहिती पारशिवणी पोलिसांना देण्यात आली.पोलिसांनी संजय यास प्राथमिक रुग्णालय पारशिवणी येथे आणले.येथील प्राथमिक उपचारानंतर त्याला नागपूर येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले.

      मात्र रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला.कार चालक विक्रांत अनिल चकोले याच्यावर गुन्हा नोदवून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.पुढील तपास पारशिवणी पोलीस करीत आहेत.