सजीव विश्वातील मानव जातीचा विचार केला तर सर्व माणसे आणि त्यांचे जीवन सारखेच आहे.निसर्गाने माणसामाणसात भेद केला नाही,परंतु माणसानेच माणसा माणसात रंगभेद ( काळा गोरा), जाती आणि अस्पृश्यता,गरीब श्रीमंत असा रंगभेद,जातीभेद, वर्गभेद निर्माण केला.असा भेदभाव माणसाने केला,देवाने किंवा निसर्गाने केला नाही.हे सत्य आहे.आणि भेदभावाचे जग हे वास्तव चित्र आहे.वंशभेद हा एक अजून त्यात भर आहे,वंश भेदातूनच ‘ वंशाचा दिवा ‘ ही संकल्पना रूढ झाली.वंशाचा दिवा कशासाठी ? तर चोऱ्या मारामाऱ्या लबाडी दादागिरी करून अन्याय अत्याचार भ्रष्टाचार करून मिळवलेली साठवलेल्या आपली संपती आपण मेल्यानंतरही आपल्याच नावाने पुढे टिकावी,या उद्देशाने ‘ वंशाचा दिवा ‘ ही स्वार्थी संकल्पना पुढे आली.हा विचार दृढ झाला.वंश त्यासाठी दिवा म्हणजे स्वतःचेच मूल हवे.( माझ्या कमाई ला म्हणजे प्रॉपर्टीला दुसऱ्याचे मुल नको,) या विचाराने स्त्रीपुरूष विवाह पद्धत सुरू झाली.विवाहामुळे कुटुंबसंस्था उदयास आली.कुटुंबातून घराणे,वंशावळी.आणि घराण्यातून घराणेशाही ( म्हणजे माझ्याच कुटुंबाची सत्ता समाजावर हवी,हा विचार ), या घराणेशाहीतूनच संस्थाने,त्यातून जहागिरी,देशमुखी,पाटीलकी,देशमाने,देशपांडे,चौगुले,अशा राजेशाहीतील घराणे निर्माण झाली,जी आजही सत्तेत सक्रिय दिसतात.
थोडक्यात असे की,आपल्या संपत्तीचे आपण मेल्यानंतरही संरक्षण व्हावे,आणि ती आपल्याच रक्ताच्या नातेस व्हावे म्हणून आपलेच मूल हवे,त्यासाठी स्त्री हवी.ती आपल्याच हक्काची असावी,म्हणून तिच्याशी शेकडो लोकांना समजावे,जाहीर व्हावे,म्हणून लग्न प्रथा रूढ झाली.यातून घराणेशाही,संस्थाने,राज्य उदयास आली.राजे राजवाडे आणि त्यातून राजेशाही,त्यातून हुकुमशाही जन्मास आली.म्हणजेच हुकूमशाहीचे मूळ हे वंशवादात आहे.या वंशवादातूनच जातीसंस्था सुद्धा उदयास आली.वंशाभिमान,वंशाचा गर्व,वंशाची अस्मिता,या सोबतच जातीची अस्मिता उदयास आली.जाती उत्पती सोबतच जातीचा अभिमान अस्मिता निर्माण होण्याचे मुख्य कारण म्हणजे ‘ जाती व्यवस्था टिकविणे,ती मजबूत करणे हा उद्देश होय.याला पुष्टी म्हणून देवाचा आणि धर्माचा आधार घेण्याची युक्ती केली.नव्हे षड्यंत्रच ते.संपत्तीचा अधिकार हक्क जोपासण्यासाठी म्हणजेच आपल्या स्वार्थासाठीच माणसाने सत्ता ईश्वर धर्म या संकल्पनांना जन्म दिला,त्याचे महत्व पटाउन दिले,याबद्दल जनतेत अस्मिता गर्व अभिमान निर्माण केला,जागृत केला.त्यासाठी जनतेत काही गट निर्माण करून ते मजबुतीही केले.हे सारे कारस्थान स्वार्थी लोभी दुष्ट दुर्जन माणसांनी केले.अशी दुर्जन गुन्हेगार माणसे संघटित होऊन बाकी असंघटित निष्पाप,सज्जन जनतेवर अन्याय अत्याचार करायला लागले.सामान्य कष्टकरी जनतेची आर्थिक सामाजिक पिळवणूक करायला लागले.देव धर्माच्या नावाने अंधश्रद्धा ,भोंदूगिरी, चमत्कार,भानामती, केगमती, सती प्रथा सुरू केली.जात वर्ग पण टिकवला.कारण देवाच्या इच्छेमुळे ,तुमच्या दैवा मुळे,पूर्वजन्मीच्या पापामुळेच तुमचा जन्म खालच्या जातीत आणि गरिबाच्या घरी झाला.असे पटविण्यात ते लोभी दुर्जन यशस्वी झाले.यातून सामाजिक आर्थिक विषमतेची अन्यायी व्यवस्था निर्माण झाली.या व्यवस्थेचा फायदा केवळ 15 टक्के असलेल्या उच्चवर्णीय जाती नाच झाला.आणि 85 टक्के समाज आणि त्यातील जाती ( sc.st.obc,अल्पसंख्यांक ) आर्थिकदृष्ट्या आणि सामाजिक दृष्ट्या अस्पृश्य म्हणून अपमानित जीवन जगत मागासलेल्याच राहिल्या.
हे मागासलेपण दूर व्हावे,त्यांना प्रतिष्ठेचे जीवन जगता यावे.विकासाच्या प्रक्रियेत यांनी यावेत,यासाठी शाहूमहाराज यांनी अस्पृश्यता नष्ट करण्याचा कायदा केला.मुलांना शिक्षण मिळावे म्हणून आपल्या राज्यात मागास जातींच्या मुलांसाठी शाळा वसतिगृहे ची सुरुवात केली.समानसंधी चे धोरण आखले,समतेचा पाया घातला.या साऱ्या गोष्टी ” सामाजिक न्यायचे तत्व आणि तत्वद्न्यान म्हणून त्यांनी अमलात आणले.हेच सामाजिक न्यायचे तत्व धोरण बाबासाहेबांनी भारतीय संविधानात समाविष्ट केले.
सामाजिक न्याय म्हणजे केवळ मागास जातींना कायमस्वरूपी आरक्षण देणे नव्हे,तर या जातींची अस्पृश्यता आणि आर्थिक दुबळेपणा नष्ट होईपर्यंत तसेच मागास जातींना सन्मान मिळेपर्यंत हे आरक्षण राहील, हे हेतू साध्य झाले की,मग आरक्षण उठवावे,यासाठी 10 ते 15 वर्ष लागतील,असा अंदाज घटनाकारांनी केला.परंतु निवडून गेलेले लोकच जातीवादी असल्यामुळे असे घडले नाही,आर्थिक दरीतले अंतर कमी व्हावे,धर्मांची भांडणे विकोपाला जाऊ नयेत,लोकशाही मजबूत व्हावी म्हणून संविधान चे प्रास्ताविकात लोकशाही,समाजवाद,आणि धर्मनिरपेक्षता या तीन गोष्टी संविधानाची मूल्य म्हणून समाविष्ट करण्याचे ऐतिहासिक कार्य इंदिरागांधी नी केले,याचे कारण समाजवादी नेहरूंची मुलगी सुद्धा समाजवादी विचाराचीच होती,म्हणून हे शक्य झाले.परंतु हे तिचे कृत्य जात्यांध धर्मांध राजकारणी लोकांना पटले नाही.तसेच सीलिंग कायदा करून जमीनदारांच्या जमिनी घेऊन गरिबांना दिल्या,बँकांचे राष्ट्रीयकरण करून बँकांचा पैसा व्यापारी कारखानदार ऐवजी गरीब दुकानदार हातगाडी भाजीवाले अशा रस्त्यावर धंदा करणाऱ्यांना दिला,म्हणून जमीनदार भांडवलदार एकी करून,काँग्रेसची इंडिकेट, सिंडीकेट अशी फाळणी करून इंदिरा गांधी चे पक्षाला बहुमत मिळू दिले नाही.निवडणुकीच्या मार्गाने तिला सत्ते पासून दूर केले.हा एक आर्थिक सामाजिक अन्यायाचा मोठा भूकंपच होता.
सामाजिक न्याय म्हणजे केवळ जातिव्यवस्था पुरताच नव्हे,तर वर्गव्यवस्थसाठी सुद्धा आहे.जगात असो की आपल्या भारतात असो,जातीव्यवस्था,वर्णव्यवस्था, रंगव्यवस्था,वर्ग व्यवस्था ही विषमतेची,विषमतावादी असेल तर आणि ही व्यवस्था टिकविण्यासाठी ईश्वराचा धर्माचा अंधश्रद्धांचा वापर होत असेल तर याचा अर्थ असा होतो की,सामाजिक न्यायाच्या योजना राबविल्या जाऊनही आरक्षण देऊनही विषमता नष्ट होत नाही,हा गेल्या 77 वर्षाचा अनुभव सांगत असेल तर,याचा अर्थ असा होतो की,ही इमारतच चुकीची बांधल्या गेली आहे.चुकीच्या इमारतीत चुकीचे निर्णय होताहेत.अशा राजकीय धोरणाने विषमतेची इमारत कोसळणार नाही.याचा अर्थ जोपर्यंत इथे जमीनदारी भांडवलदारी व्यवस्था आहे,तो पर्यंत हे ‘ सामानिक न्यायचे तत्व,धोरण,योजना ‘ फेल च होणार आहेत,हे मतदारांच्या लक्षात येणे गरजेचे आहे.त्याशिवाय विषमतावादी लोकप्रतिनिधी कोण ? आणि समतावादी लोकप्रतिनिधी कोण ? हे समजणार नाही.आणि जोपर्यंत समतावाद्यांच्या हाती सत्ता येणार नाही,तोपर्यंत व्यवस्था बदलणार नाही,व्यवस्था बदलल्या शिवाय ‘ सामाजिक न्यायचे तत्व अमलात येणार नाही.सामाजिक न्यायाच्या योजना म्हणजे भिकाऱ्याला,आंधळ्याला,पंगू माणसाला,दरिद्रीला भीक देणे नव्हे,भुंकू नये म्हणून कुत्र्याला भाकरीचा किंवा मांसाचा तुकडा टाकणं नव्हे.सामाजिक न्यायाची योजना म्हणून समाजात फूट पाडणे नव्हे.अर्थात या अशा तोकड्या भिकेच्या फुकटांच्या योजनांमुळे माणूस अरावलंबी लाचार लाजिरवाणा बनत चाललेला आहे.आपल्यातील हिंमत,आत्मविश्वास,सहकार्य,संघटित वृत्ती गमावून बसला आहे, आणि परत एकदा गुलाम बनत आहे.
सामाजिक न्याय म्हणजे माणसाला गुलाम बनविणे नव्हे,विषमतेची व्यवस्था टिकविणे नव्हे.सामाजिक न्यायचे धोरण आणि योजना अशा असल्या पाहिजेत की,ही विषमतावादी व्यवस्थाच नष्ट झाली. पाहिजे.जो पर्यंत समतावादी व्यवस्था निर्माण होणार नाही, तो पर्यंत कुणालाही सामाजिक न्याय मिळणार नाही.


