दिक्षा कऱ्हाडे
वृत्त संपादिका
सध्या जगभरात जेफ्री एस्टीन आणि त्याच्याशी संबंधित कागदपत्रांची (Epstein Files) जोरदार चर्चा सुरू आहे. या प्रकरणामध्ये अनेक बड्या जागतिक नेत्यांची आणि सेलिब्रिटींची नावे समोर येत आहेत. यातच तिबेटी धर्मगुरू दलाई लामा यांचेही नाव या वादग्रस्त यादीत असल्याची चर्चा सुरू होती, ज्यामुळे एकच खळबळ उडाली होती. मात्र, आता या सर्व चर्चांवर दलाई लामांच्या कार्यालयाकडून अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आले असून, त्यांनी या प्रकरणात आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
दलाई लामा यांच्या कार्यालयाने जेफ्री एस्टीन याच्यासोबतच्या कोणत्याही भेटीचे वृत्त फेटाळून लावले आहे. कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनात स्पष्ट म्हटले आहे की, १४ वे दलाई लामा आणि जेफ्री एस्टीन यांच्यात कधीही भेट झालेली नाही.
तसेच, दलाई लामा यांनी त्यांच्या वतीने कोणालाही एस्टीनशी भेटण्याची किंवा चर्चा करण्याची परवानगी दिली नव्हती. माध्यमांमध्ये ज्या बातम्या येत आहेत की दलाई लामा यांनी एस्टीनसोबत जेवण केले होते किंवा त्यांची खाजगी भेट घेतली होती, त्या सर्व बातम्या निराधार आणि चुकीच्या आहेत.
कागदपत्रांमध्ये दलाई लामा यांच्या नावाचा उल्लेख असण्यामागे एस्टीनची इच्छा असू शकते, असे बोलले जात आहे. उपलब्ध माहितीनुसार, २०१४ मध्ये एस्टीनने एका ईमेलमध्ये दलाई लामा यांच्या भेटीसाठी काही लोकांना घेऊन जाण्याची इच्छा व्यक्त केली होती, परंतु प्रत्यक्षात अशी कोणतीही भेट झाली नाही.
त्यामुळे या प्रकरणात दलाई लामा यांचा थेट संबंध जोडणे चुकीचे असल्याचे त्यांच्या कार्यालयाने स्पष्ट केले आहे. या खुलाशाने त्यांच्या भक्तांना आणि अनुयायांना मोठा दिलासा मिळाला आहे.


