Home Maharashtra इंद्रायणी स्वच्छतेसाठी लोकप्रतिनिधीसह प्रशासन, वारकरी व ग्रामस्थ एकवटले…

इंद्रायणी स्वच्छतेसाठी लोकप्रतिनिधीसह प्रशासन, वारकरी व ग्रामस्थ एकवटले…

दिनेश कुऱ्हाडे 

   उपसंपादक 

आळंदी : इंद्रायणी नदी स्वच्छतेसाठी आळंदी नगरपरिषद व आळंदी देवस्थान व ग्रामस्थ यांच्या वतीने राबविण्यात आलेल्या विशेष स्वच्छता अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. लोकप्रतिनिधी, प्रशासन, वारकरी, ग्रामस्थ आणि विविध सामाजिक संघटनांनी मोठ्या संख्येने सहभागी होत स्वच्छतेचा संदेश दिला. यावेळी आ.बाबाजी काळे, नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे, उपनगराध्यक्षा सुजाता तापकीर, गटनेते सचिन गिलबिले, विरोधी पक्षनेते आदित्य घुंडरे, मुख्याधिकारी माधव खांडेकर, आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त डॉ.भावार्थ देखणे, विश्वस्त पुरुषोत्तम महाराज पाटील, तसेच आजी-माजी पदाधिकारी आणि वारकरी साधक, शालेय विद्यार्थी, सामाजिक संघटना व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

         सकाळी आठ वाजता मोहिमेला प्रारंभ झाला. नदी पात्रातील राडारोडा काढणे, कचरा संकलन, घाट परिसर स्वच्छ करणे अशी कामे हाती घेण्यात आली. मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी स्वतः नदी पात्रात उतरून स्वच्छता करत प्रशासनाच्या कटिबद्धतेचे दर्शन घडविले. नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे सपत्नीक मोहिमेत सहभागी झाले, तर आमदार बाबाजी काळे यांनीही प्रत्यक्ष सहभाग नोंदविला.

          आमदार बाबाजी काळे म्हणाले, “इंद्रायणी ही आळंदीच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू आहे. नदी स्वच्छ ठेवणे ही केवळ प्रशासनाची नव्हे, तर प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे. अशा मोहिमांतून जनजागृती होऊन कायमस्वरूपी बदल घडेल.”

            नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे यांनी सांगितले, “स्वच्छ इंद्रायणी हीच आपली खरी सेवा आहे. प्रशासन आणि नागरिक एकत्र आले तर नदी स्वच्छतेचा प्रश्न नक्कीच मार्गी लागेल. या अभियानाला मिळालेला प्रतिसाद उत्साहवर्धक असून पुढेही सातत्याने असे उपक्रम राबविण्यात येतील.” वारकरी आणि ग्रामस्थांच्या सहभागामुळे वातावरणात भक्ती आणि सामाजिक बांधिलकीचा संगम अनुभवायला मिळाला. “स्वच्छ इंद्रायणी, सुंदरआळंदीकर 6 आळंदी” हा संदेश देत नागरिकांनी नदी संवर्धनासाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार व्यक्त केला.