खासदार सुनील मेंढे सांस्कृतिक महोत्सवातून कलावंताच्या सुप्त इच्छांना मोकळी वाट…. — शेतात कष्ट करणारे पायही मुक्तपणे व्यक्त झाले….

प्रितम जनबंधु

   संपादक 

भंडारा :– मनात अनेक इच्छांचे वादळ होते. मात्र त्यांना मोठी वाट मिळत नव्हती. ग्रामीण भागातील वातावरण, संसाराचा गाडा हाकताना होणारी दमछाक आणि ग्रामीण संस्कृतीच्या चौकटीत अडकलेल्या आयुष्यातून जरा स्वतःला वेगळे करून ग्रामीण भागातील महिलांनी खासदार सांस्कृतिक महोत्सवाचा अनुभवलेला आनंद त्यांच्यासाठी नक्कीच अप्रूप होता. या व्यासपीठाने ग्रामीण भागातील प्रतिभेला नवीन चकाकी दिली, तरुण तरुणींना नृत्याचे क्षेत्र सुद्धा करिअर ठरू शकते याचा संदेश दिला आणि भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील सांस्कृतिक संस्कृती खऱ्या अर्थाने ढवळून निघाली. लहान लेकराला कडेवर घेऊन आलेली आणि नंतर व्यासपीठावर मुक्तपणे नृत्यकलेचे दर्शन घडविणारी माता याच महोत्सवात पाहायला मिळाली.

          मागील दीड ते दोन महिन्यांपासून भंडारा गोंदिया जिल्ह्यात म्हणजेच संपूर्ण लोकसभा मतदारसंघ, मतदार संघात ज्याची चर्चा होती आणि ज्याचा समारोपही तेवढ्याच दिमाखात झाला अशा खासदार सांस्कृतिक महोत्सवाने या दोन्ही जिल्ह्यांना बरेच काही दिले. केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार खासदार सुनील मेंढे यांच्या संकल्पनेतून आणि स्वर्गीय बाबुराव मेंढे स्मृति प्रतिष्ठानच्या पुढाकारातून साकारलेला हा सांस्कृतिक महोत्सव ग्रामीण भागातील कलाकारांना त्यांच्या प्रतिभेची जाणीव करून देणारा ठरला. 

 

            आधी तालुकास्तरावर आणि तालुकास्तरावर विजेत्या ठरलेल्या स्पर्धक समूहांना लोकसभा स्तरावर आपले कौशल्य दाखवण्याची मिळालेली संधी कदाचित जिल्ह्यात पहिल्यांदाच तरुण-तरुणी आणि कष्टकरी महिलांसाठी चालून आली होती. जवळपास 492 समूह, त्यातील 4970 सहभागी स्पर्धक आणि या स्पर्धकांच्या कलागुणांना दाद देण्यासाठी जवळपास 19 हजाराच्या घरात हजेरी लावणारा प्रेक्षक या महोत्सवाची फलश्रुती म्हणावी लागेल.

           पारंपारिक समूह नृत्य, तरुण – तरुणींच्या समूहांचे परंपरेला आणि संस्कृतीला धरून झालेल्या नृत्याच्या स्पर्धा आणि शेतकरी, शेतात राबणाऱ्या कष्टकरी मजूर महिला, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, बचत गटाच्या महिला यांचा महोत्सवात असलेला सहभाग खूप काही सांगून गेले.

            चूल आणि मूल या पलीकडेही विश्व असते, या महोत्सवाच्या निमित्ताने महिलांनी अनुभव घेतला. उत्सव मंडपात येईपर्यंत कडेवर असलेल्या लेकराला कुणाच्यातरी स्वाधीन करून मनातील सुप्त गुणांना भव्य दिव्य अशा व्यासपीठावर मुक्तपणे उधळणारी ग्रामीण भागातील महिला या महोत्सवाने प्रेक्षकांपुढे आणली. संस्कृती आणि संस्कारांचा कुठेही विसर न पडता महिलांनी सादर केलेल्या कलागुणांचे मुक्तकंठाने प्रेक्षकांकडून कौतुक झाले. एरवी घर आणि घरच्यांची चिंता एवढाच विचार डोक्यात ठेवणाऱ्या या मातृशक्तीने स्वतःला व्यक्त होताना कुठलीही कसर ठेवली नाही हे नक्कीच कौतुकास्पद आहे. अगदी वयाची साठी गाठलेल्या महिलांचा सहभागी तेवढाच वाखाणण्याजोगा आहे. आज पाश्चिमात्य डान्स आणि त्यात पाहायला मिळणारा गोंधळ या मानसिकतेच्या पलीकडे जात युवक आणि युवतींनी नृत्य प्रकार आजही संस्कृती लोकांच्या मनात घर करून आहे हेच सांगत होती. कधीही न पाहिलेला भव्य दिव्य रंगमंच, आकर्षक विद्युत रोषणाई आणि त्याला साजेशी ध्वनी व्यवस्था आम्हाला झाडीपट्टीच्या पलीकडे विचार करण्यास भाग पाडणारी होती. आदिवासी महिला बांधवांनी सादर केलेल्या नृत्य प्रकारांनी आदिवासी संस्कृतीचे यथार्थ दर्शन या मंचावर झाले.

            कार्यक्रम अनेक होतात मात्र ते क्षणिक असतात. पण हा महोत्सव कायम लोकांच्या मनात घर करून राहणार आहे. घरातील एका व्यक्तीच्या सादरीकरणामुळे अख्या कुटुंबाला झालेला आनंद महोत्सव स्थळी पाहण्यासारखा होता. या महोत्सवात सहभागी झालेल्या प्रत्येक कलाकाराच्या पाठीशी त्याच्या घरचे कुटुंब खंबीरपणे उभे असल्याचे दिसत होते. हा महोत्सव केवळ मनोरंजन नाही, तर समाजाला एकत्रित आणि वेगवेगळ्या संस्कृतीत बांधण्याच्या दृष्टीने टाकलेले महत्त्वाचे पाऊल असेही याकडे पाहता येईल.

           भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील ग्रामीण भागात सांस्कृतिक महोत्सवाने ढवळून निघालेले वातावरण बऱ्याच बदलांसाठी पोषक ठरू शकते.

           महोत्सवात आलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी झाडीपट्टीतील या कलागुणांचे तोंडभर कौतुक केले. एवढेच नाही तर या प्रतिभेला पुढे नेण्याच्या दृष्टीने अत्याधुनिक नाट्यगृह बांधण्याची घोषणा करून खूप मोठी भेट भंडारा गोंदिया जिल्ह्याला दिली. या महत्त्वाच्या फलितांपैकी हे सुद्धा एक महत्त्वाचे असू शकते.

            महिलांसाठी कायम झटत राहणाऱ्या भाजपाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांची उपस्थिती आणि त्यांच्या प्रेरणादायी भाषणातून महिलांना मिळालेली ऊर्जा दखल घेण्यासारखी आहे.

        केवळ कार्यक्रम न करता त्यातून समाजासाठी काहीतरी देण्याच्या हेतूने खासदार सुनील मेंढे यांनी खासदार सांस्कृतिक महोत्सवाच्या माध्यमातून केलेले ही धडपड नक्कीच ग्रामीण भागातील सांस्कृतिक संस्कृतीला उभारी देणारी ठरेल यात शंका नाही.