Home Social चिमूरमध्ये भव्य ‘स्त्री सन्मान सोहळा’; गिनीज बुक रेकॉर्ड लावणी कलाकारांचा होणार ११...

चिमूरमध्ये भव्य ‘स्त्री सन्मान सोहळा’; गिनीज बुक रेकॉर्ड लावणी कलाकारांचा होणार ११ मार्चला सत्कार…

शुभम गजभिये

 विशेष प्रतिनिधी…

       जागतिक महिला दिनानिमित्त तेली समाज कल्याणकारी महिला मंडळ व श्री‌ संताजी जगनाडे महाराज कल्याणकारी मंडळ,चिमूर यांच्या संयुक्त विद्यमाने “स्त्री सन्मान सोहळा – २०२६” या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 

       हा कार्यक्रम ११ मार्च २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता श्री.रुकुडगिर देवस्थान, पेट मोहल्ला,चिमूर येथे संपन्न होणार आहे.

           समाजातील महिलांच्या सामाजिक बांधिलकी,बौद्धिक विचार आणि त्यांच्या हक्कांना व्यासपीठ मिळावे या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 

                कार्यक्रमात विविध स्पर्धा आणि सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून महिलांचा उत्स्फूर्त सहभाग अपेक्षित आहे.कार्यक्रमाची सुरुवात टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तू तयार करण्याच्या स्पर्धेने होणार असून त्यानंतर मराठी भक्तिगीत गायन स्पर्धा पार पडणार आहे.दुपारी १२ वाजता उद्घाटन समारंभ होईल.

         या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये लावणी सादरीकरण करून चिमूरसह संपूर्ण जिल्ह्याचे नाव जागतिक स्तरावर पोहोचवणाऱ्या लावणी कलाकारांचा भव्य सत्कार करण्यात येणार आहे. 

       त्यानंतर वेशभूषा स्पर्धा आयोजित करण्यात आली असून सायंकाळी ५ वाजता बक्षीस वितरण करण्यात येईल.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारती बावनकर मुख्याध्यापीका जिल्हा परिषद शाळा भटाळा राहणार आहेत तर डॉ.अश्विनी पिसे वैद्यकीय अधिकारी उपजिल्हा रुग्णालय चिमूर हे उद्घाटक म्हणून कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. 

        तसेच प्रमुख पाहुणे म्हणून अर्चना वंजारी मुख्याधिकारी नगर परिषद चिमूर,कल्याणी येवले संगणक अभियंता नगर परिषद चिमूर आणि पुष्पा हरणे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या तेली समाज चिमूर उपस्थित राहणार आहेत.

        या भव्य महिला दिन कार्यक्रमाला महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.