दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी : “श्रीमद्भागवत कथा ही केवळ धार्मिक वाचन नसून ती भक्ती, ज्ञान आणि वैराग्य यांचा सुंदर संगम आहे. भागवत ऐकणाऱ्या प्रत्येकाच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडविण्याची ताकद या कथेच्या माध्यमातून मिळते,” असे प्रतिपादन भागवताचार्य ह.भ.प. सिद्राम महाराज काळे यांनी केले.
आळंदी नगरीत गं.भा. विमल (काकू) गोपाळ पाटील कुऱ्हाडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या संगीत श्रीमद्भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्यात ते बोलत होते. त्यांच्या सुश्राव्य आणि रसाळ वाणीतून श्रीमद्भागवत कथेचे निरूपण होत असून कथेचा लाभ घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे.
कथेच्या माध्यमातून भागवत धर्माचे महत्त्व, भक्तीमार्गाची साधना तसेच जीवनातील सदाचार आणि आध्यात्मिक मूल्ये यांचे सोप्या शब्दांत विवेचन करण्यात येत आहे. सिद्राम महाराज काळे यांच्या प्रभावी कथनशैलीमुळे उपस्थित भाविक मंत्रमुग्ध होत असून वातावरण भक्तीरसाने भारावून गेले आहे.
संगीत श्रीमद्भागवत कथा ज्ञानयज्ञ या सोहळ्याचे आयोजन ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे विश्वस्त योगेंद्र कुऱ्हाडे व परिवाराच्या वतीने करण्यात आले असून वारकरी, भाविक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून कथेचा लाभ घेत आहेत. आयोजकांनी अधिकाधिक भाविकांनी उपस्थित राहून कथेचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री.भैरवनाथ महाराज उत्सव मंडळाचे अध्यक्ष शंकरराव कुऱ्हाडे यांनी केले आहे.



