आशा वर्कर व गट प्रवर्तकच्या मानधनात वाढ… — दिवाळी बोनस व कंत्राटी कर्मचारी दर्जा देण्याचे मान्य… — आशा व गटप्रवर्तक कृती समितीने पुकारलेला संप मागे घेण्याचा निर्णय…

प्रितम जनबंधु

     संपादक 

गडचिरोली :–18 ऑक्टोबर पासून राज्यातील 72 हजार आशा व गटप्रवर्तक त्यांच्या मागण्यासाठी बेमुदत संपावर होत्या अनेक जिल्ह्यांमध्ये उपोषण निदर्शने जेलभरो आंदोलन सुरू होते. दरम्यानच्या काळात माननीय आरोग्य मंत्री तानाजी सावंत, विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवाळ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बरोबर वेळोवेळी चर्चा होऊन अखेर आज 8 नोव्हेंबर रोजी अप्पर मुख्य सचिव मिलिंद म्हैसेकर यांच्याकडे खासदार हेमंत आप्पा गोडसे यांच्या उपस्थितीत चर्चा होऊन अखेर प्रमुख मागण्या मान्य झाल्याने बेमुदत संप मागे घेण्याचा निर्णय दिवाळीपूर्व आज झालेल्या कृती समितीच्या बैठकीत घेण्यात आला.

           आशा व गटप्रवर्तकांच्या मागण्या मान्य केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आरोग्य मंत्री तानाजी सावंत उपसभापतीनरहरी झिरवाळ, खासदार हेमंत गोडसे, अप्पर मुख्य सचिव मिलिंद म्हैसेकर यांनी सकारात्मक निर्णय केल्याने समाधान व्यक्त करण्यात आले.

           महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा कृती समितीच्या वतीने दिनांक 18 ऑक्टोबर 2023 पासून 72 हजार आशा व 3672 गटप्रवर्तक संपावर होत्या संप काळात माननीय आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी आशांना सात हजार रुपये व गटप्रवर्तकांना सहा हजार दोनशे रुपये वाढ व आशा व गटप्रवर्तकांना दोन हजार रुपये दीपावली भेट जाहीर केली होती. मात्र गटप्रवर्तकांना आशांच्या तुलनेने कमी वाढ जाहीर केल्याने व कंत्राटी दर्जाबाबत निर्णय न केल्याने गटप्रवर्तक व आशांमध्ये असंतोष होता. त्यामुळे कृती समितीने संप सुरूच ठेवला होता .

         विधानसभा उपाध्यक्ष नामदार नरहरी झिरवाळ यांच्या दालनात 3 नोव्हेंबर रोजी कृती समिती बैठक झाली. त्यात त्यात गटप्रवर्तकांना दहा हजार रुपये वाढ व कंत्राटी कर्मचारी दर्जाबाबत शासनाने निर्णय घ्यावा असे निर्णय झाले होते.

         त्यानंतर मुख्यमंत्री महोदय नामदार एकनाथ शिंदे यांना कृती समितीच्या नेत्यानी दरेबुद्रुक येथे मुख्यमंत्री यांची भेट घेतली होती. त्यांनी अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर यांना गटप्रवर्तकांना दहा हजार रुपये वाढीचा प्रस्ताव तयार करून मंत्रिमंडळ बैठकीत पाठवा असे फोनवर आदेशित केले होते.

      दिनांक 8 नोव्हेंबर 2023 रोजी धीरज कुमार साहेब आयुक्त राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई यांनी माननीय डॉक्टर अशोक बाबू जॉईन सेक्रेटरी भारत सरकार आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय दिल्ली यांना राज्य सरकार तर्फे पत्र लिहून आशा व गटप्रवर्तकांच्या मोबदल्यात केंद्र सरकारने वाढ करावी तसेच गटप्रवर्तकांना कंत्राची कर्मचारी दर्जा देणेबाबत लेखी प्रस्ताव पाठविला आहे.

         संपाबाबत तोडगा काढण्यासाठी खासदार हेमंत गोडसे यांनी संपाबाबत तोडगा काढण्याकरीता आज अप्पर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर यांचे बरोबर कृती समितीची बैठक दिनांक 9 नोव्हेंबर 2023 रोजी मुंबई येथे घेण्यात आली.

           गटप्रवर्तकांना कंत्राची दर्जा बाबत राज्य सरकार तर्फे शिफारस केंद्राकडे केली आहे, मुख्यमंत्री महोदयांनी आदेशित केल्याप्रमाणे गटप्रवर्तकांना दहा हजार रुपये वाढीचा व आशांना 7000 रुपये वाढीचा प्रस्ताव मंजुरीसाठी सादर केला आहे. तरी कृती समितीने संप मागे घ्यावा असे आवाहन करण्यात आले.

      तसेच वरील निर्णयाची अंमलबजावणीसाठी खासदार गोडसे व कृती समिती पाठपुरावा करतील.

           सर्वच मागण्याबाबत सकारात्मक निर्णय झाल्याने राज्यातील आशा व गटप्रवर्तकांनी संप मागे घेऊन कामकाज सुरू करावे असे आवाहन कृती समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

        दीपावलीच्या निमित्ताने राज्यातील लढाऊ आशा व गटप्रवर्तकांना कृती समितीच्या वतीने शुभेच्छा ….

 संपातून मिळालेले यश…..

१)गटप्रवर्तकांना दहा हजार रुपये, आशांना सात हजार रुपये वाढ.

२) गटप्रवर्तकांना कंत्राची कर्मचारी दर्जा देणेबाबत राज्य सरकारकडून केंद्राकडे शिफारस.

३) केंद्र सरकारने आशा गटप्रवर्तकांच्या मोबदल्यात वाढ करण्याबाबत राज्य सरकारकडून केंद्राकडे शिफारस.

४) आशांना जननी सुरक्षा योजना जी एस वाय चा लाभ एपीएल व बीपीएल भेदभाव न करता सरसकट मिळणार.

५) या व्यतिरिक्त आरोग्य मंत्री यांनी आशा व गटप्रवर्तकांना पगारी प्रसूती रजा व गटप्रवर्तकांना आरोग्यवर्धीनीचा मोबदला देण्यासंदर्भात केंद्र सरकारकडे शिफारस करणार असे आश्वासित केले आहे.

६) पाचवी ते दहावीपर्यंत शिक्षण झालेल्या ,जेथे मोबाईल नेटवर्क उपलब्ध नाही अशा ठिकाणी काम करणाऱ्या अशा स्वयंसेवकांच्या अडचणी समजून घेणार. आशांनी ऑनलाईन कामाबाबतच्या समस्या संघटनेकडे द्याव्यात. सदर बैठकीसाठी काँ. राजू देसले कॉम्रेड एम ए पाटील, शंकर पुजारी, भगवान देशमुख उपस्थित होते.

             बेमुदत चाललेला संप 23 व्या दिवशी कृती समितीच्या निर्णय नुसार मागे घेत असल्याची घोषणा जिल्हा परिषद कार्यालय समोर आयोजित बेमुदत धरणे आंदोलनात फटाके फोडून आनंद साजरा करण्यात आला. यावेळी आयटक चे राज्य सचिव विनोद झोडगे, जिल्हाध्यक्ष देवराव चवळे, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य कार्यकारणी सदस्य ड्रॉ.महेश कोपुलवार, नगर सेवक अँड जगदीश मेश्राम, जिल्हा सचिव सरिता नैताम, रजनी गेडाम, संगीता मेश्राम, जयमाला सोरते, विद्यादेवी येजुलवार, ज्योत्स्ना बनसोड, प्रज्ञा उपाध्ये, सोनाली ठाकरे, माया दिवटे, माया कांबळी, संजू शहारे, ज्योत्स्ना रामटेके यांनी शाषण निर्णयाचे स्वागत केले आहे. 

         बेमुदत संप यशस्वी करणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यातील सर्व आशा वर्कर व गट प्रवर्तक कर्मचारी ताईंचे आयटक चे राज्य सचिव विनोद झोडगे यांनी अभिनंदन केले आहे.