विघ्नहर्त्याचा उत्सव निर्विघ्न साजरा करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करु.:- व.पो.नि.सुनील गोडसे.. — आळंदीत गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेश मंडळांची बैठक…

दिनेश कुऱ्हाडे

उपसंपादक 

पुणे विभागीय 

आळंदी : आगामी गणेशोत्सवात सर्वांनी सौहार्दपणे सहभागी होऊन शांतता व उत्साहाच्या वातावरणात व पर्यावरणपूरक साजरा करावा, धुमधडाक्यात जोशात गणेश उत्सव साजरा करा पण सय्यम तेवढाच ठेवा विघ्नहर्त्याचा उत्सव निर्विघ्न साजरा करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करुन पोलिसांना सर्वांना सहकार्य करुन कडेकोट बंदोबस्त ठेवण्याचे आवाहन आळंदी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील गोडसे यांनी केले. तसेच या उत्सवासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना लागणाऱ्या विविध परवानग्यांसाठी एक खिडकी सुविधा उपलब्ध करावी, असे निर्देशही गोडसे यांनी आळंदी प्रशासनाला दिले.

        आगामी गणेशोत्सवासंदर्भात आळंदी पोलिस स्टेशन मध्ये शांतता कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी व.पो.निरिक्षक सुनील गोडसे हे उपस्थित होते. या बैठकीस आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी कैलास केंद्रे, डि.डि.भोसले, प्रकाश कुऱ्हाडे, प्रशांत कुऱ्हाडे, आनंदराव मुंगसे, अजित वडगावकर, उत्तम गोगावले, बाळासाहेब चौधरी, पांडुरंग बनकर, युवराज वहीले, निसार सय्यद तसेच विविध विभागांचे अधिकारी, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी व अन्य सदस्य उपस्थित होते.

            यावेळी आगामी गणेशोत्सवा संदर्भात प्रशासनाने केलेल्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यात आला. तसेच श्री गणेशाचे आगमन व विसर्जन मिरवणूक मार्ग रहदारी व्यवस्थापन, डिजे मुक्त मिरवणूक, वीज पुरवठा, याबाबत काटेकोरपालन करावे, असे आवाहन गोडसे यांनी केले. स्थापना ते विसर्जन या कालावधीत गणेश मंडळांना कोणतीही अडचण येणार नाही यासाठी पोलीस विभाग सज्ज व दक्ष आहे, असेही सांगण्यात आले. गणेशोत्सव शांतता व सौहार्दाच्या वातावरणात पार पाडावा व त्यासाठी सर्व मंडळांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले. नगरपरिषदेच्या वतीने गणेश विसर्जनासाठी अनेक ठिकाणी कृत्रिम तलाव निर्मिती केली जाईल, असे मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी सांगितले, यावेळी झालेल्या चर्चेत मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाग घेतला. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.