भाजप-शिवसेना युतीच्या सरकारमध्ये येण्याचा अजित पवारांचा निर्णय स्वागतार्ह – हर्षवर्धन पाटील…  — लोकसभा व विधानसभेच्या उमेदवारीचा निर्णय भाजपचे केंद्रीय नेतृत्व घेईल…  — इंदापुरात भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा गर्दीत संपन्न…

 नीरा नरसिंहपुर दिनांक :9

प्रतिनिधी:- बाळासाहेब सुतार,

           राज्यातील सत्तारूढ भाजप-शिवसेना युतीच्या सरकारमध्ये येण्याचा अजित पवार यांचा निर्णय स्वागतार्ह आहे. त्यामुळे आगामी सन 2024 मध्ये लोकसभा निवडणुकीत राज्यातून भाजप-शिवसेना महायुतीचे 45 प्लस खासदार निवडून येऊन नरेंद्रजी मोदी हे सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होणार आहेत. तसेच लोकसभा व विधानसभा जागेच्या उमेदवारीचा निर्णय भाजपचे केंद्रीय नेतृत्व घेईल, अशी माहिती भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी रविवारी (दि.9) दिली.

           इंदापूर येथे अर्बन बँकेचे सभागृहात तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांच्या संवाद मेळावा रविवारी संपन्न झाला. तसेच याप्रसंगी हर्षवर्धन पाटील यांची पत्रकार परिषद झाली. सदर प्रसंगी हर्षवर्धन पाटील बोलत होते.

         उपमुख्यमंत्री अजित पवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृह मंत्री व सहकार मंत्री अमित शाह यांचे नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेना-भाजप युतीमध्ये येण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील युतीचे सत्तारूढ सरकार अधिकचे गतिमान होणार आह. इंदापूर तालुक्यातील विकास कामांना शिवसेना-भाजप महायुती सरकारकडून निधीची कामतरता पडू दिली जाणार नाही, अशी स्पष्ट ग्वाही यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी दिली.

      या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन आदी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी विविध विषयावर चर्चा झाल्या. इंदापूर तालुका भाजपसाठी आगामी राजकीय भविष्यकाळ उज्ज्वल असणार आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी काळजी करण्याचे कारण नाही, स्पष्ट मत हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केले.

         ते पुढे म्हणाले, लाकडी-निंबोडी योजसाठी उपमुख्यमंत्री व जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सुमारे रु. 295 कोटीची निविदेची प्रक्रिया 15 दिवसापूर्वी पूर्ण झाली आहे. लाकडी-निंबोडी योजना मार्गी लावणे हे भाजपचे प्रमुख ध्येय आहे. तसेच खडकवासला ते लोणी काळभोर पर्यंत खडकवासला कालव्यासाठी आता बोगदा केला जाणार आहे. त्यामुळे वाढीव पाणी हे दौंड, इंदापूर तालुक्याला मिळणार आहे. तसेच मुळशी धरणाचे पाणी दौंड, इंदापूर तालुक्याला मिळण्यासाठी शासन स्तरावर अहवाल तयार केला जात असून, त्यामुळे सदरचे पाणीही दौंड, इंदापूर तालुक्याला मिळणार आहे. तालुक्यातील 22 गावांना आपण 7 नंबर फॉर्म वरून पाणी मिळवून दिले आहे. गेली 25-30 वर्षे झाले हे पाणी नियमितपणे शेतकऱ्यांना मिळत आहे. आगामी काळातही 22 गावांना पाणी कमी पडू दिले जाणार नाही, असे हर्षवर्धन पाटील यांनी स्पष्ट केले.

        इंदापूर शहरात वीरश्री मालोजीराजे यांच्या ऐतिहासिक गढीचे संवर्धन व स्मारक उभे करणेसाठी आर्किटेक व इतर प्रक्रिया मुख्यमंत्री कार्यालय व पर्यटन विभागामार्फत सुरू आहे, असे नमूद करून हर्षवर्धन पाटील पुढे म्हणाले,इंदापूर तालुक्यातील निरा नदीवरील सर्व बंधाऱ्यांची पाणी साठवण क्षमता वाढविण्याच्या कामांचे प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आले आहेत. उजनी जलाशयाच्या प्रदूषणाचा प्रश्नही मार्गी लावण्यासाठी आपले शासनस्तरावर प्रयत्न सुरू आहेत. इंदापूर तालुक्यात अनेक नवीन वीज रोहित्रे मंजूर केली आहेत, ठिकठिकाणी ती बसविण्याचे काम चालू आहे. लोणी देवकरला आपण युती सरकारमध्ये असताना पंचतारांकित एमआयडीसी मंजूर केली. त्यामुळे हजारो युवकांना रोजगार मिळाला आहे. आता शिवसेना-भाजप सरकारच्या माध्यमातून लोणी देवकर एम.आय.डी.सी. नवीन प्रकल्प आणायचे आहेत. त्यातून आणखी युवकांना रोजगार मिळणार आहे, असे त्यांनी सांगितले.

              तालुक्यातील कर्मयोगी शंकररावजी पाटील कारखान्यास रु.150 कोटी व निरा भीमा कारखान्यास रु.75 कोटी रुपयांच्या अर्थसाह्याची रक्कम केंद्र सरकारकडून राज्य सरकारकडे करण्यात वर्ग करण्यात आली आहे. राज्य सरकारकडून सदरची रक्कम तातडीने दोन्हीं कारखान्यांच्या बँक खात्यात वर्ग होईल. या कामी केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सहकार्य लाभले. त्यामुळे दोन्हीं कारखाने सुस्थितीत येणार आहेत,असे हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केले. प्रास्ताविक तालुका भाजपचे अध्यक्ष अँड. शरद जामदार यांनी केले. यावेळी बाबा महाराज खारतोडे यांना तालुका भाजपच्या प्रवक्ते पदी निवडीचे पत्र देण्यात आले. या मेळाव्यास तालुक्यातील भाजपचे पदाधिकारी, पदाधिकाऱ्यांनी गर्दी केली होती. सूत्रसंचालन रघुनाथ पन्हाळकर,तर आभार इंदापूर शहराध्यक्ष शकील सय्यद यांनी मानले.