राष्ट्रवादी काँग्रेसचा तीन दिवसांचा खेळ म्हणजे नौटंकी आणि घरगुती तमाशा : चंद्रशेखर बावनकुळे  — कसबा मतदार संघामध्ये भाजप बूथ प्रमुखांचा महामेळावा….

दिनेश कुऱ्हाडे

   प्रतिनिधी

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रयत शिक्षण संस्थेचा अध्यक्ष होण्यासाठी घटना बदलली. राज्यात अशा अनेक शिक्षण आणि सहकारी संस्था आहेत ज्यांच्या घटना बदलून शरद पवार अध्यक्ष झाले आहेत. त्यामुळे शरद पवार दुसऱ्याला कसे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष होऊ देतील. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जे काही घडले ते सर्व स्क्रिप्ट होती. राष्ट्रवादी काँग्रेसचा तीन दिवसांचा खेळ म्हणजे नौटंकी आणि घरगुती तमाशा होता. अशा शब्दात भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पवार यांच्या राजीनाम्यावर भाष्य केले.

कसबा मतदार संघामध्ये बूथ प्रमुखांचा महामेळावा बावनकुळे यांच्या उपस्थितीत सोमवारी संपन्न झाला. तत्पूर्वी ते पत्रकारांशी बोलत होते. मेळाव्याला पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, विक्रांत पाटील, उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश राजेश पांडे आदी उपस्थित होते.

बावनकुळे म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत घडामोडीमध्ये भाजपचा कुठलाही डाव नव्हता. अजित पवार यांचा बरोबर गेल्या चार महिन्यापासून माझा संपर्क झालेला नाही. किंवा ते आमच्या कुठल्याही नेत्याच्या संपर्कात नाहीत. अजित पवार यांना महाविकास आघाडीकडूनच टार्गेट केले जात आहे. दरम्यान शरद पवार हे महाराष्ट्राचे मोठे नेते आहेत. त्यांनी तरी देंवेद्र फडणवीस यांच्या सारख्या कार्यकर्त्यांवर बोलू नये असे बावनकुळे म्हणाले.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपला निवडून येण्यासाठी कुणाचीही गरज नाही. मोदींच्या नेतृत्वात आम्ही कर्नाटक जिंकूच व तेथे भाजपचे सरकार येईल असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त करीत, भाजपा कमळाच्या समोर कॉम्प्रमाईज करत नसल्याचे सांगितले. तसेच मराठी भाषेला आणि मराठी माणसाला न्याय देण्याची आमची कायमच भूमिका असल्याचेही ते म्हणाले.

घर चलाे अभियान

भारतीय जनता पक्षाव्दारे घर चलो अभियान राबविण्यात येत असून, याकरिता राज्यातील २८८ विधानसभा मतदार संघात आम्ही बुथ प्रमुखांचा बैठका घेत आहोत. पक्ष संघटनेच काम मजबूत करण्याचा हा प्रयत्न असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. लोकशाही कशी असते हे पाहयचे असेल तर भाजपकडे सर्वांनी पहावे. दुसऱ्या पक्षात लोकशाही नसून केवळ घराणेशाही आहे. त्यांना दुसऱ्यांना मोठे करायचे नाही हे सध्याच्या घडामोडीवरून दित आहे.