उपक्षम रामटेके
मुख्य कार्यकारी संपादक
शेतकऱ्यांनी न विकलेल्या शेतजमिनीचा फेरफार एका दिवसात होतोय व सदर शेतकऱ्यांच्या शेतजमिनी कोळसा उत्खनन करणाऱ्यां कंपन्यांच्या नावावर केली जातय,हि कुठल्या प्रकारची कार्यपद्धत महसूल विभागाची आहे? असा प्रश्न पिडित-शोषीत,शेतकऱ्यांच्या द्वारे उपस्थित केला जात आहे.
तद्वतच कोळसा उत्खनन कंपनी संचालकांकडून शेतकऱ्यांवर सर्रास अन्याय आणि अत्याचार होत असताना चंद्रपूर जिल्ह्याचे महसूल अधिकारी शांत व चूप कसे काय? हा मुद्दा आता कायदेशीर बनला आहे.
अपर जिल्हाधिकारी चंद्रपूर यांचा न्यायालयात अनेक कंपन्यांनी शेतजमिनी बाबत बोगस फेरफार केल्या बाबत प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.
कायद्याचे अभ्यासक तथा तलाठी विनोद खोब्रागडे यांनी प्रश्न उपस्थित केला आहे की,एका दिवसात कुठलाही आदेश नसताना शेतकऱ्यांच्या शेतजमिनीचा फेरफार कसा केला?
एकीकडे कोर्टाचा आदेश राहुनही,अनेक वर्षांपासून महसूल अधिकारी यांनी फेरफार केले नाही,अखेर विष प्राशन करून शेतकरी परमेश्वर मेश्राम मरण पावलाय.
तर,दुसरीकडे भद्रावती तालुक्यातील अनेक खाजगी कंपन्यांच्या हितासाठी व फायद्यासाठी,शेतजमिन हस्तांतरित करण्यासंबंधाने वरिष्ठांनी कुठल्याही प्रकारचे आदेश दिले नसतानाही,तलाठी यांनी एका दिवसात बोगस फेरफार घेऊन त्याच दिवशी मंडळ अधिकारी हे सदर फेरफार प्रमाणीत करतात व कोळसा कंपन्यांना ७/१२ देतात,आणि बोगस सातबाऱ्याला अनुसरून कंपन्या अवैध कोळशाचे उत्खनन करतात? या अशा बेकायदेशीर कार्यपद्धतीला कोणाचे संरक्षण आहे?,याबाबत भद्रावती तहसीलदार यांनी सांगितले पाहिजे.”काय सुरु आहे आपल्या चंद्रपूर जिल्ह्यात?असा थेट प्रश्न महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना घटना अभ्यासक तथा तलाठी विनोद खोब्रागडे यांनी केला आहे.
चंद्रपूर जिल्हातंर्गत भद्रावती तालुक्यातील मौजा बरांज मोकासा येथील में कर्नाटक एम्टा कंपनी बेंगलोर व में कर्नाटक पावर कार्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनी बेंगलोर यांच्या विरुद्ध विनोद खोब्रागडे सामाजिक कार्यकर्ते वरोरा व एक अपंग शेतकरी संतोष पुनवटकर यांनी अप्पर जिल्हाधिकारी चंद्रपूर यांचा न्यायालयात,अपील केली.
कंपनीने बोगस फेरफार करून,सदर कंपनी अवैध कोळशाचे उत्खनन करीत असल्याने त्यांच्या विरुद्ध अप्पर जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्याकडे अपील दाखल केले असून कंपनी ला नोटीस इशु झाले होते.त्या संबंधाने आज दिनांक ०७/१०/२०२५ ला सुनावणी होती.
तसेच बेलोरा येथील में अरबिंदो कंपनी हैद्राबाद लिमिटेड ही सुद्धा बोगस फेरफार करून अवैध कोळशाचे उत्खनन करीत आहे.त्यांच्या विरुद्ध सुध्दा अपर जिल्हाधिकारी चंद्रपूर यांचा न्यायालयात विनोद खोब्रागडे सामाजिक कार्यकर्ते वरोरा व सात शेतकरी यांनी अपील दाखल केली असून नोटीस इशु झाले होते.या प्रकरणाची सुध्दा आज दिनांक ०७/१०/२०२५ रोज मंगळवारला सुनावणी होती.
तसेच चंद्रपूर जिल्हातंर्गत जिवती तालुक्यातील मौजा कुंसूबी येथील २४ आदीवासी शेतकऱ्यांचा जमीनीवर ४२ वर्षांपासून में मानीकगढ सिमेंट कंपनी व आताची अल्टाटेक सिमेंट कंपनी अवैध चुनखडी चे उत्खनन करीत आहे व बोगस फेरफार करून गावठाण सह गाव ताब्यात घेतले आहे.त्यांच्या विरुद्ध विनोद खोब्रागडे व २४ शेतकरी यांनी अप्पर जिल्हाधिकारी चंद्रपूर यांचा न्यायालयात अपील दाखल केली असून नोटीस इशु झाले होते.या प्रकरणाची सुध्दा आज दिनांक ०७/१०/२०२५ रोजी सुनावणी होती.
जर लोकप्रतिनिधी,आमदार,खासदार,मंत्री,शासन,प्रशासन,यांनी आपले अधिकार व कर्तव्ये बजावले असते,तर विनोद खोब्रागडे यांना मागील ३० वर्षापासुन नौकरीत राहुन कंपनी व अधिकाऱ्यांचे विरुद्ध न्यायालयात अपील दाखल करुन संघर्ष करण्याची वेळ आली नसती हे तितकेच खरे आहे.
शेतकरी व समाज बांधवांनी जागृत होणे आवश्यक आहे व आपल्या न्याय व हक्कासाठी त्यांनी संघर्ष करणे गरजेचे आहे असे या तिन्ही प्रकारच्या प्रकरणावरून लक्षात येते आहे.
आत्महत्या कुणीही करु नका जिवन अनमोल आहे,असा संदेश विनोद खोब्रागडे यांनी शेतकरी बांधवांना दिला आहे.
चंद्रपूर जिल्हातंर्गत शेतकऱ्यांच्या शेतजमिनी बळजबरीने कंपनीच्या नावाने करुन स्वतःचा फायदा तलाठी,मंडळ अधिकारी,व इतर अधिकारी करुन घेत आहेत.
शेतकऱ्यांना परेशान करणारे व अन्यायातंर्गत त्यांचे शोषण करणारे अधिकाऱ्यांचे राकेट चंद्रपूर जिल्ह्यात कार्यरत आहे.अशा अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना सेवेतून मुक्त केले पाहिजे आणि त्यांच्यावर फौजदारी कारवाई महाराष्ट्र सरकारने केली पाहिजे या मताचे अत्याचारग्रस्त शेतकरी आहेत.



