Home देशविदेश कोण कुणाचे मालक? आणि कोण कुणाचे गुलाम?…

कोण कुणाचे मालक? आणि कोण कुणाचे गुलाम?…

          हा विषय समजून घेण्याआधी गुलाम आणि मालक या संकल्पनेची व्याख्या आणि अर्थ समजून घेणे जरुरीचे आहे.

          मालक याचा अर्थ भौतिक वस्तू वरील हक्क आणि अधिकार,आणि निर्णय घेणे ज्याच्या हाती असतो असा व्यक्ती,असे घराणे,असा व्यक्ती समूह,अशी राजकीय संघटना,म्हणजे मालक.

         आणि गुलाम या शब्दाचा ,संकल्पनेचा अर्थ असा की,ज्याची भौतिक वास्तूवर मालकी नाही,भौतिक साधने आणि माध्यमावर मालकी नाही, जो स्वतःच्या अस्तित्वाचे निर्णय स्वतः घेऊ शकत नाही,त्याच्या अस्तित्वाचे निर्णय ,हक्क ,अधिकार हे अन्य कुण्या व्यक्तीच्या,समूहाच्या ,हातात असतात असा व्यक्ती,समूह म्हणजे गुलाम होय.

         ज्याला विचार स्वातंत्र्य आणि ते अभिव्यक्ती करण्याचे स्वातंत्र्य नाही,अशी व्यक्ती किंवा समूह म्हणजे गुलाम होत. ज्यांना मानवी हक्क आणि अधिकार नाहीत,ते गुलाम,आणि ज्यांना मानवी हक्क आणि अधिकार आहेत,ते मालक. ज्यांना व्यक्तिगत अथवा सामूहिक निर्णय घेण्याचा अधिकार नाही,ते गुलाम आणि असे निर्णय घेण्याचे हक्क अधिकार ज्यास आहेत,ते मालक.

          मानवी हक्क म्हणजे विचार व अभिव्यक्ती स्वातंत्र्य,बंधूभाव जोपासण्याचे स्वातंत्र्य,हक्क,सहयोगाने,सहकार्याने एकत्र राहण्याचे स्वातंत्र्य,हक्क,अधिकार,निर्णय घेण्याचा अधिकार,न्याय मिळण्याचा हक्क,समता जोपासण्याचा हक्क,जिवंत राहण्याचा अधिकार,शिक्षण,रोजगार,आरोग्य,अन्न,वस्त्र,निवारा या मूलभूत गरजा मिळवण्यासाठी संघर्ष करण्याचा हक्क अधिकार म्हणजे गुलामीतून मुक्तता होय.

            भारतीय जनतेस स्वातंत्र्य लढ्यानंतर राजकीय स्वातंत्र्य मिळाले,देशाच्या संविधानाने कायद्याने गुलामी नष्ट केली,असे असले तरी,भारतातून गुलामी हद्दपार झाली असे चित्र आजही म्हणजे स्वातंत्र्यानंतर 77 वर्षानंतरही दिसत नाही,याचे कारण केवळ संविधानाने,कायदे करून बहुजनांची गुलामी नष्ट होत नाही, तर त्या संविधानाची ,कायद्यांची अमल बजावणी व्हावी लागते.

         आता प्रश्न असा पडतो की,संविधान आणि कल्याणकारी कायद्यांची अंमलबजावणी का केल्यागेली नाही ? याचे उत्तर असे की,सत्ता मालकांच्याच हातात आहे.ती गुलामांच्या हाती असायला हवी होती.

         मालक या शब्दाची व्याख्या म्हणजे ज्यांच्या हाती म्हणजे ताब्यात उत्पादनांची साधने मोठ्या प्रमाणात आहेत तो वर्ग,म्हणजे श्रीमंत व भांडवलदार वर्ग.गर्भश्रीमंत ज्यांच्या ताब्यात येथील नैसर्गिक साधन संपती आहे,उदा.जमीन,शेती,पाणी,जंगल,कारखाने,उद्योग.यावर ज्यांची मालकी ते म्हणजे मालक.आणि यांचेच सरकार म्हणजे सत्ता.सत्ता म्हणजे शासन , प्रशासन, पोलिस,सैन्य यावर ज्यांचा अधिकार,म्हणजे हे ज्यांचे ताब्यात ते म्हणजे मालक.

         शासन म्हणजे मंत्रिमंडळ,कायदे करणारे ,धोरण ठरविणारे हे आमदार खासदार आणि त्या कायद्याची धोरणांची अंमलबजावणी करणारे म्हणजे मंत्रिमंडळ म्हणजे सरकार.मग ते राज्याचे असेल की केंद्राचे,हेच या भांडवली लोकशाहीतील मालक वर्ग आहेत,आणि बहुसंख्य,बहुजन वर्ग जो मतदार तो यांचा गुलाम आहे.

          याचा अर्थ असा की,संविधान आणि कल्याणकारी कायद्याने केल्याने जरी गुलामी संपली,असे आपण म्हटले तर ते चुकीचे होईल,कारण गुलामी नष्ट झाल्याचा तो एक आभास होय.भासमान लोकशाही म्हणजे गुलाम मालकीची व्यवस्था नष्ट होणे नव्हे.जो पर्यंत गरीब मध्यम श्रीमंत ही उतरंड व्यवस्था ,वर्गीय व्यवस्था यातील दरी कमी होणार नाही,किंवा ही उतरंड उध्वस्त होणार नाही,म्हणजेच आर्थिक समता प्रस्थापित होणार नाही, तो पर्यंत मालक गुलामीची ही विषमतावादी व्यवस्था नष्ट होणार नाही.याशिवाय बहुजन तो जातिनिहाय जरी मोजला तरी त्याची गुलामी नष्ट होणार नाही.

          या करिता भारतीय आर्थिक सामाजिक सांस्कृतिक व्यवस्था परिस्थिती अवस्था याचा विचार करून याचे वास्तव जाणून घेऊन,या आकलनातून असा निष्कर्ष काढावा लागेल की,जातीय,प्रवर्गीय बहुजन हा गुलामच आहे,आणि वर्गीय गरीब मध्यम हा माणूस गुलामच आहे.अर्थात वर्गीय गुलाम आणि प्रवर्गीय गुलाम एकत्र येणे,संघटित होणे,आणि संघर्ष करून सत्ता हस्तगत करणे ही वर्तमानकालीन गरज आहे,यामुळेच बहुजनांची गुलामी नष्ट होणार आहे.

          म्हणून वर्गीय विचार मांडणारे मार्क्सवादी,समाजवादी,तसेच ‘जात’ केंद्रस्थानी धरून सामाजिक समतेचा विचार मांडणारे शाहू फुले आंबेडकरवादी एकत्र येऊन लढल्या शिवाय भारत ‘ गुलाम मुक्त ‘ होणार नाही.

              लेखक

             दत्ता तुमवाड

            सत्यशोधक समाज नांदेड

                  फोन : 9420912209