मेंढपाळांची चाऱ्यासाठी गावोगावी भटकंती.. — दुर्दशा व दुर्दैव…

    सुधाकर दुधे

तालुका प्रतिनिधी सावली 

        भर पावसाळ्यात चाऱ्याच्या शोधात पर जिल्ह्यात गेलेले बकऱ्यांचे कळप चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यात परतले आहेत.मात्र तालुक्यातील अद्याप धनपिकाच्या जमिनी रिकाम्या झालेल्या नाहीत.तसेच गवत कापणीही झालेली नाही,यामुळे बकऱ्यांच्या व मेंढ्यांच्या उपजिविकेसाठी तीव्र चारा टंचाई जाणवत असल्याची भयानक परिस्थिती पुढे आली आहे.

           मेंढपाळांची चाऱ्यासाठी गावोगावी वणवण भटकंती सुरू आहे.प्रगत युगातही मेंढपाळांच्या नशिबी भटकंती कायमच आहे यासारखे त्यांचे दुर्दैव दुसरे असू शकत नाही.

         सावली तालुक्यात धनगर समाजाची संख्या मोठी आहे.हा समाज पारंपरिक मेंढपाळीचे काम करतो.एका मेंढपाळाकडे पन्नासपासून पाचशेपर्यंत बकऱ्यांचा कळप असतो.या बकऱ्यांची पैदास व विक्री करणे,त्यांची लोकर कापणे,घोंगडी बनवणे यासारखे व्यवसाय करून ते वर्षानुवर्षे उदरनिर्वाह चालवत असतात.

              चंद्रपूर जिल्ह्यात पावसाचे प्रमाण जास्त असते.तसेच पावसाची झड बकऱ्यांना त्रासदायक ठरते.त्यामुळे जूनच्या सुरुवातीच्या आठवड्यात मेंढपाळांचा मोर्चा पावसाच्या अन्य जिल्ह्यांकडे वळतो व पावसाळा संपताच बकऱ्यांचे कळप परत जिल्ह्यात परतले आहेत.

            यंदा पावसाने ऑगस्टपासूनच दडी मारल्याने महिनाभर अगोदरच या कळपांचे आगमन झाले आहे.मात्र,त्यांना चाऱ्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.यंदा धान कापणी व मळणी हंगाम नुकताच सुरू झाला आहे.यामुळे तर मेंढपाळांची मोठी अडचण झाली आहे.

           धान पीक हंगाम संपल्यावर रिकाम्या झालेल्या शेतजमिनीत शेतकरी मेंढपाळाचे कळप बसवतात.बकऱ्यांच्या विष्ठेचे लेंडी खत पिकांना अतिशय उपयुक्त असते.त्यामुळे शेतकऱ्यांचा बकऱ्यांचा तळ बसवण्याकडे कल असतो. 

          या बदल्यात मेंढपाळांना अन्न,धान्य व थोडेफार पैसे दिले जातात. तेच त्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन आहे.

****

कोट..

     वाघ,बिबट,कोल्हे वन्यप्राणी सर्वत्र वाढल्यामुळे शेळ्या व मेंढ्या पाळणे फार कठीण झाले आहे.तसेच पाळीव प्राणी पाळणे अतिशय कठीण काम असल्यामुळे नवयुवक या व्यवसायाकडे पाठ फिरवीत आहेत.शासनाने चराई क्षेत्र राखीव करून हा व्यवसाय वाढवीण्याकडे लक्ष द्यावे..

विजय कोरेवार 

 जिल्हाध्यक्ष 

महाराष्ट्र कांग्रेस विभूक्त जाती भटक्या जमाती विभाग..