Home देशविदेश अनु.जाती-जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्याअंतर्गत कारवाईची मागणी… — आंदोलनानंतर स्वामी आनंद स्वरुप...

अनु.जाती-जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्याअंतर्गत कारवाईची मागणी… — आंदोलनानंतर स्वामी आनंद स्वरुप यांच्याव रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

दिक्षा कऱ्हाडे 

 वृत्त संपादिका 

नवी मुंबई : कोपरखैरणे येथे आंबेडकरी समाजाच्या भावना दुखावणाऱ्या वक्तव्याविरोधात तीव्र संताप व्यक्त करत कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन छेडले.स्वयंघोषित धार्मिक गुरु स्वामी आनंद स्वरूप यांनी केलेल्या आक्षेपार्ह आणि जातीय तेढ निर्माण करणाऱ्या वक्तव्याच्या निषेधार्थ ही भूमिका घेण्यात आली.

             सदर व्यक्तीने भोंदू अशोक खरात यांच्या संदर्भात बोलताना “महार जातीचा शूद्र” असा अवमानकारक उल्लेख केला,तसेच “आंबेडकर बिरादरी के जितने भी लोग है उनका कर्म उनका चरित्र कुकर्मी है” असे विधान करत संपूर्ण आंबेडकरी समाजावर गंभीर आरोप केले. ही विधाने केवळ एका समाजाचा अपमान नसून सामाजिक सलोखा बिघडवण्याचा स्पष्ट प्रयत्न असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.ही बाब थेट डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारसरणीवर आघात करणारी असून संविधानिक मूल्यांना आव्हान देणारी आहे.

           त्यामुळे संबंधितांवर अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियमांतर्गत तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. ACP कार्यालय,कोपरखैरणे येथे झालेल्या ठिया आंदोलनानंतर प्रशासनाने दखल घेतली.पंकज डहाणे (DCP) यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.त्यानुसार रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

           यावेळी वंचितचे जिल्हाध्यक्ष अश्वजीत जगताप यांनी स्पष्ट शब्दांत इशारा देत म्हटले की, “आंबेडकरी समाजाचा अपमान कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही. संविधानिक मूल्यांवर घाला घालणाऱ्यांविरोधात कायद्याच्या चौकटीत राहून तीव्र लढा उभारला जाईल.” तसेच ॲड. स्वप्निल जगताप यांनी सांगितले की, “ही केवळ भावना दुखावण्याची बाब नसून कायद्याने दंडनीय गुन्हा आहे.संबंधितांवर कठोर कारवाई होईपर्यंत आमचा लढा सुरूच राहील.”

            या आंदोलनात रिपब्लिकन पक्षाचे प्रवक्ते सचिन कटारे,ॲड.स्वप्निल जगताप,ॲड.अमोल उघाडे,वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष अश्वजित जगताप,महासचिव मल्लिनाथ सोनकांबळे,ऐरोली तालुकाध्यक्ष राजेश भालेराव,रिपब्लिकन पक्षाचे उपाध्यक्ष लक्ष्मण गोडसे,मयूर भोसले,भारतीय बौद्ध महासभेचे रविंद्र सदाफुले,मल्हारी शिंदे,लोखंडे साहेब,ॲड.शैलेश लाटकर,ॲड.सौरव मोरे,भीम आर्मीचे प्रकाश पाईकराव व इतर आंबेडकरी चळवळीतील अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.समाजात द्वेष पसरवणाऱ्या प्रवृत्तींविरोधात कायद्याचा कठोर वापर होणे आवश्यक असल्याची ठाम भूमिका यावेळी व्यक्त करण्यात आली.