Home देशविदेश छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत अयोग्य टिपण्या करणाऱ्यांची कायदेशीर वरात...

छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत अयोग्य टिपण्या करणाऱ्यांची कायदेशीर वरात भारत सरकार व महाराष्ट्र सरकार काढणार काय? — अन्यथा जगात बदनाम व्हाल!…

प्रदीप रामटेके 

  मुख्य संपादक 

           रयतेचे महान राजे छत्रपती शिवाजी महाराज आणि युगप्रवर्तक,भारतीय संविधान निर्माता,विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबतीत अनुचित बोलणाऱ्यांची,त्यांना हिन शब्दात लेखणाऱ्यांची,कायदेशीर वरात भारत सरकार आणि महाराष्ट्र राज्याचे सरकार काढणार काय?

          न्यायप्रिय,समातावादी,गोरबरीब रयतेचे कैवारी,रयतेचे संरक्षक,कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज हे जातीभेद पाळणारे नव्हते,धर्माधर्मात भांडणे लावणारे नव्हते,धर्म आणि जात पाहून न्याय भुमिका घेणारे नव्हते,रयतेवर अन्याय करणारे नव्हते,ते रयतेसोबत बंधुत्व जपणारे एक महान तत्वज्ञानी लोकराजा होते.

           महान योध्दा म्हणून इतिहासात अजरामर असलेल्या खुल्या मनाच्या परिवर्तनवादी छत्रपती शिवाजी महाराजांची कार्यक्षमता,कर्तव्यदक्षता,संवेदनशीलता,चारित्र्यसंपन्नता,आणि विर्यता आज,उद्या,पर्वा,भविष्यात मोजणे कुणालाही शक्य नाही.

        त्या जैन मुनीला प्रश्न आहे तुम्ही कोणता इतिहास वाचून आणि कोणते वास्तव पुढे ठेवून,”धर्माधर्मात द्वेष पसरविणाऱ्या,भांडणे लावू इच्छिणाऱ्या,सातत्याने व्यर्थ बडबडणाऱ्या,संकुचित विचार सरणीच्या ना.निलेश राणेंसोबत,”छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना केलीय?

             नीलेशचंद्र जैन मुनी,जे बारगळले ते चुकीचेच!”बहुजन समाजातील लोक शांत आहेत म्हणून त्यांनी स्वतःला निट सांभाळणे वेळीच शिकले पाहिजे.

       नामदार निलेश राणे यांचे समाजासाठी योगदान नाही,त्यांनी समाज हितासाठी आजपर्यंत धडपड केली नाही,अशा द्वेषी व खुज्या विचारांच्या मानसाची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांसोबत करणे अनुचित आहे.

        छत्रपती शिवरायांसारखे होण्याआधी,प्रथमतः शिवरायांचे विचार ना‌.निलेश राणे यांच्यासह जैन मुनींनी अंगिकारून बघितले पाहिजे.छत्रपती शिवरायांसारखी समता,स्वातंत्र्य,बंधुता,न्याय हे तत्व तरी ना.निलेश राणे आणि निलेशचंद्र जैन मुनीं यांच्या अंगी आहेत का.? याचा तपास महाराष्ट्र सरकारने केला पाहिजे.तद्वतच त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे या मताची महाराष्ट्र राज्यातील जनता आहे.

         सध्याच्या काळात ना.निलेश राणेंची सुरुवात नेहमी हिंदू-मुस्लिम भांडण लावण्यापासून होत असल्याने ते पद व शपथेच्या गोपनीयतेचे वारंवार उल्लंघन करतात.यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची मंत्रिमंडळातून उचलबांगडी केली पाहिजे.याचबरोबर भोंदू मुनीची चौकशी आहे.

        जैन मुनींनी ना.निलेश राणे सोबत छत्रपती शिवाजी महाराजांसी तुलना करणारे वक्तव्य करतांना जिभ सांभाळायला पाहिजे होती.कारण ना.नितेश राणे विकृत पद्धतीने रोज समाजात तेढ निर्माण करण्यासारखे वक्तव्य करीत फिरत असतात.त्यांना महाराष्ट्र सरकारने समाजासमाजात तेढ निर्माण करणाऱ्या कामांसाठीच ठेवले आहे काय असा संसय आता येवू लागला आहे.

         उठसूट कोणीही येऊन महापुरुषांचा अपमान करतो आणि त्याचे कोणी काहीच करत नाही.याला काय म्हणावे?

विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर…..

       डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार,थोर समाजसुधारक,अर्थतज्ज्ञ आणि विश्वमान्य कायदेपंडित आहेत. 

        त्यांनी अस्पृश्यता निवारण,महिला हक्क,कामगार सुधारणा आणि दलितांसह एसटी,अल्पसंख्याक,ओबीसींच्या आणि इतरांच्या सामाजिक-राजकीय हक्कांसाठी आयुष्यभर लढा दिला.

       डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री म्हणून त्यांनी देशाच्या जडणघडणीत मोलाची भूमिका बजावली. 

       डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले,नव्हेतर त्यांनी जगातील सर्वात मोठे आणि लिखित संविधान तयार केले.

       अस्पृश्यता निवारणासाठी त्यांनी १९२४ मध्ये ‘बहिष्कृत हितकारिणी सभा’ स्थापन केली,महाडचा चवदार तळ्याचा सत्याग्रह (१९२७) आणि मनुस्मृतीचे दहन यांसारखे ऐतिहासिक लढे दिले.

       महिलांना समान अधिकार मिळवून देण्यासाठी ‘हिंदू कोड बिल’ मांडले,ज्याद्वारे मालमत्तेत हक्क,घटस्फोटाचा अधिकार आणि शिक्षणासाठी प्रयत्न केले.

       मजूरमंत्री म्हणून त्यांनी कामगारांसाठी कामाचे १२ ते १४ तासावरून ८ तास केले,तसेच कामगार विमा योजना आणि एम्प्लॉयमेंट एक्सचेंजची स्थापना केली.

     “शिका,संघटित व्हा आणि संघर्ष करा” हा संदेश देऊन भारतीय नागरिकांमध्ये स्वाभिमान जागृत केला.

       भारतीय रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेत (१९३५) त्यांचा मोठा वाटा होता, जो ‘द प्रॉब्लेम ऑफ द रुपी’ या पुस्तकातील संकल्पनेवर आधारित होता.त्यांचे संपूर्ण जीवन समता,बंधुता आणि न्यायाच्या तत्त्वांवर आधारित होते. 

        डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे जगातील सर्वाधिक तत्वज्ञान्यांपैकी एक आहेत.त्यांनी मुंबई विद्यापीठ,कोलंबिया विद्यापीठ (न्यू यॉर्क) आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून अर्थशास्त्र,राज्यशास्त्र,कायदा आणि तत्त्वज्ञान या विषयांत पदवी,एम.ए.पीएचडी,डी.एस्सी.आणि बॅरिस्टर-एट-लॉ यांसारख्या उच्च पदव्या मिळवल्या.

       जगविख्यात प्रकांड पंडित विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी प्रोढ भारतीयांना,(महिला पुरुषांना) मताधिकार मिळवून दिला.याचबरोबर मुलभूत अधिकारांसह इतर अधिकार भारतीय संविधानाच्या माध्यमातून भारतीयांना मिळवून दिले.म्हणूनच भारतीय लोक ताठ मानेने आणि स्वाभिमानाने जिवन जगत असल्याचे दिसून येत आहे.

         डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे थोर विचारवंत होते,त्यांनी शिक्षणाचे महत्त्व ओळखून पिपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली आणि सिद्धार्थ व मिलिंद महाविद्यालय सुरू केले.

          ज्या डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून,सर्व भारतीय नागरिकांना सर्व प्रकारचे आवश्यक अधिकार बहाल केलीत,स्वाभिमानाने जगण्याचे सर्व मार्ग खुले केलीत,वर्णव्यवस्थेच्या बंधनातून (आताच्या बहुजन समाजातील सर्व नागरिकांना.) मुक्त करीत स्वतंत्र केले,शिक्षणाची दारे मोकळी केली,खासदार,आमदार,अधिकारी,कर्मचारी,असे लोकप्रतिनिधी बनण्याचा सन्मान प्राप्त करून दिला,त्याच युगप्रवर्तक डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करणारे,त्यांना अनुचित बोलणारे विविध लोक सरकारच्या छत्रछायेखाली व संरक्षणात वावरताना दिसतात हे राष्ट्र हितासाठी घातक ठरणारे आहे.

        संविधान निर्माता म्हणजे लोक निर्माता,देश निर्माता हा सरळ अर्थ भारतीय नागरिकांनी स्वतःच्या उद्धारासाठी लवकरात लवकर लक्षात घेतलेले बरा!

त्यांची वरात वेळीच काढा….

          जे लोक छत्रपती शिवाजी महाराज आणि युगप्रवर्तक डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत अनुचित बोलतात,खालच्या स्तरावर बोलतात,त्यांची कायदेशीर वरात भारत सरकारने व महाराष्ट्र सरकारने वेळीच काढली पाहिजे.

         कारण छत्रपती शिवाजी महाराज प्रजेचे उत्तम रक्षण करणारे राजा म्हणून इतिहासातील पनात अजरामर झाले आहेत तर डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे विश्वाचे युगप्रवर्तक ठरले आहेत,त्यांना महातत्वज्ञानी व थोर समाजसुधारक म्हणून जगाने मान्य केले आहे.

        म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराज आणि युगप्रवर्तक डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबतीत अनुचित बोलणाऱ्याची नसबंदी वेळीच केली पाहिजे.अन्यथा भारत देश जगात बदनाम होईल,जगातील माणसांच्या मनातून उतरुन जाईल असे संभाव्य धोके आहेत.