Home Social पिंपरी बुद्रुक गावचे ग्रामदैवत पीरसाहेब बाबांच्या उरूसाची यात्रा कमिटीच्या वतीने जय्यत तयारी…

पिंपरी बुद्रुक गावचे ग्रामदैवत पीरसाहेब बाबांच्या उरूसाची यात्रा कमिटीच्या वतीने जय्यत तयारी…

  बाळासाहेब सुतार

निरा नरसिंहपुर प्रतिनिधी 

          पिंपरी बुद्रुक तालुका इंदापूर मंदिरातील गावचे ग्रामदैवत पीरसाहेब बाबांचा सालाबाद प्रमाणे होणाऱ्या उरूसासाठी कार्यकर्ते व गावातील ग्रामस्थान साठी उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. चालू वर्षीच्या उरूसामुळे चांगलाच तयारीला वेग आला आहे.

         गावातील कार्यकर्ते आणि पदाधिकारी व ग्रामस्थांच्या सहकार्याने आणि भक्तांच्या सहभागातून यंदाही उरूस मोठ्या श्रद्धा-भक्तीने साजरा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

          सोमवार दिनांक 9 मार्च रोजी संदल, संध्याकाळी देवाचा झेंडा घेऊन रंगाची एकमेकांना उधळण करून संपूर्ण गावात वाजत गाजत ग्राम प्रदक्षिणा घेण्यात येत असते. दुसऱ्या दिवशी मंगळवार दिनांक 10 मार्च रोजी मुख्य उरूस, या निमित्त गावामध्ये मेवा मिठाईची दुकाने, खेळणी विक्रीचे मोठे स्टॉल, व दुपारी देवाला महानैवेद्य दिला जातो.नंतर संध्याकाळी देवाच्या घोड्याची गावातून वाजत गाजत ग्राम पदक्षिणा काढण्यात येत असते, व रात्री 9 ते 12 या वेळेत भाविकांच्या व ग्रामस्थांच्या मनोरंनासाठी लोकनाट्य तमाशा मंडळाचा कार्यक्रम घेण्यात आला आहे. हजारो श्रोते मंडळी या कार्यक्रमासाठी आपली उपस्थिती लावतात.

             तिसऱ्या दिवशी बुधवार 11मार्च रोजी यात्रा मोठ्या प्रमाणात भरलेली असते मेवा मिठाई खरेदी करण्यासाठी महिला भगिनी आणि छोट्या बालकांची व भाविकांची धांदल मोठ्या प्रमाणात असते नंतर दुपारी 3 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत कुस्त्याचा फड भरवीला जातो. यासाठी जिल्हा व जिल्ह्या बाहेरूनही नामांकित पैलवानांची हजेरी होत असून, कुस्त्या झाल्यानंतर देवाचा मानाचा घोडा घेऊन मंदिराला पाच ग्राम प्रदक्षिणा वाजत गाजत घेतल्या जातात नंतर आलेल्या सर्व भाविकांना महाप्रसाद व श्रीफळ देऊन यात्रेची सांगता होत असते. 

         उरुसा निमित्त गावातील मंदिर परिसराची संपूर्ण गावची स्वच्छता, यात्रेकरूंन पिण्यासाठी स्वच्छ पाणी, मंदिराला रंगरंगोटी मंडप तसेच विद्युत रोषणाईची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. उरुसाच्या दिवशी ग्रामस्थांच्या वतीने मोठ्या प्रमाणात महाप्रसादाचे वाटपही करण्यात येत असते.

           पिंपरी बुद्रुक ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच, उपसरपंच, आजी-माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष, विविध संस्थांचे आजी-माजी चेअरमन, व्हाईस चेअरमन, शिक्षण संस्था अध्यक्ष, उपाध्यक्ष, पिरसाहेब यात्रा कमिटी, शिवशक्ती तरुण मंडळ, राजमुद्रा ग्रुप, अनेक क्षेत्रातील संघटनेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष ग्रामसेवक, ग्रामपंचायत कर्मचारी, यांच्यासह सर्व कार्यकर्त्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने उरूसाच्या जबाबदाऱ्या वाटप करण्यात आल्या आहेत.

           ग्रामस्थांनी स्वयंप्रेरणेने देणग्या जमा करून कार्यक्रमासाठी आवश्यक व्यवस्था केली आहे. पीरसाहेब बाबांच्या मंदिराला मंडप संपूर्ण विद्युत रोषणाई व उरूसा निमित्त देवाच्या मिरवणुकीसाठी फटाके, हलगी लेझीम व ढोल-ताशा पथक, देवासाठी फुलांची सजावट तयारी सुरू आहे.

         गावातील ज्येष्ठ नागरिकांनी सांगितले की, पीरसाहेब बाबांच्या उरूसामुळे सर्व धर्म समभाव समाज व गावातील एकरूपता, यावेळी पहावयास आनंद मिळतो.त्यामुळे सर्व धर्मीय नागरिक या उत्सवात सहभागी होतात, हीच या परंपरेची खास वैशिष्ट्ये आहेत.

         यंदाचा उरूस शांततेत आणि उत्साहात पार पडावा, यासाठी पिंपरी बुद्रुक ग्रामपंचायत व पंचक्रोशीतील ग्रामस्थ यांच्या कडूनही आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. गावकऱ्यांमध्ये उरूसाबाबत प्रचंड उत्साह असून मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.