ऋषी सहारे
संपादक
ब्रह्मपुरी/नागभीड :- भारत कृषिप्रधान देश म्हणून ओळखला जात असला, तरी आजचा शेतकरी अन्याय, शोषण आणि अमानवी अत्याचारांच्या गर्तेत अडकलेला आहे. अवैध सावकारी, आर्थिक पिळवणूक आणि थेट मानवी अवयव तस्करीसारख्या भयावह प्रकारांनी शेतकऱ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त होत असताना, शासन, प्रशासन आणि लोकप्रतिनिधींची बधिर शांतता ही अधिकच अस्वस्थ करणारी ठरत आहे. याच पार्श्वभूमीवर रोशन कुळे या शेतकऱ्यावर झालेल्या अमानवी अन्यायाविरोधात ब्रह्मपुरी–नागभीड तालुक्यात जनतेचा संताप आज रस्त्यावर उसळून आला.
अवघ्या एक लाख रुपयांच्या कर्जावर तब्बल ७४ लाख रुपयांची वसुली करणाऱ्या अवैध सावकारांच्या क्रौर्यामुळे रोशन कुळे यांचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झाले. शेती, वाहने, दागिने विकूनही सावकारांची पाशवी भूक शमली नाही. अखेर परिस्थिती इतकी विदारक झाली की, कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्याला स्वतःची किडनी विकण्याची वेळ आली. हा केवळ एका व्यक्तीचा नाही, तर संपूर्ण शेतकरी वर्गाच्या हतबलतेचा आणि व्यवस्थेच्या अपयशाचा आरसा आहे.
या गंभीर प्रकरणात कोणताही लोकप्रतिनिधी, सत्ताधारी सरकारचा एकही जबाबदार प्रतिनिधी रोशन कुळेंच्या दारात पोहोचला नाही, ही बाब जनतेच्या रोषाला अधिकच खतपाणी घालणारी ठरली. याच निष्क्रियतेविरोधात महाराष्ट्र राज्य किसान सभा,शेतकरी संघटना , सामाजिक संघटना आणि शेतकरी नेते माजी मंत्री बच्चूभाऊ कडू ,माजी आमदार वामनराव चटप, किसान कामगार नेते कॉ विनोद झोडगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मिंथुर ते नागभीड तहसील कार्यालय येथे भव्य जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला.
हा मोर्चा कोणत्याही राजकीय पक्षाशिवाय केवळ जनतेच्या स्वतःच्या खर्चाने, तन–मन–धनाने आणि स्वयंप्रेरणेने उभा राहिलेला संघर्ष होता, हे या आंदोलनाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य ठरले. विदर्भातील विविध जिल्ह्यांतून शेतकरी, युवक, सामाजिक कार्यकर्ते आणि संवेदनशील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
मोर्चाला संबोधित करताना बच्चूभाऊ कडूंनी शासन आणि लोकप्रतिनिधींवर कठोर शब्दांत हल्लाबोल केला.
“गडचिरोलीकडे जाणारा मुख्यमंत्री रोशन कुळेंच्या गावाला ओलांडून जातो, पण त्या शेतकऱ्याच्या वेदना पाहायला थांबत नाही. आमदार देखील त्याच्या दारात जाऊ शकत नाहीत. पाकिटाच्या बळावर निवडणूक जिंकणारे हे लोक शेतकऱ्यांच्या कामाचे नाहीत,” अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला.
रोशन कुळेंना न्याय मिळाला नाही, तर याहून तीव्र आंदोलन उभारू, प्रसंगी कायदा हातात घेण्याची वेळ आली तरी मागे हटणार नाही, असा स्पष्ट इशारा बच्चू भाऊ कडू, विनोद झोडगे पाटील यांनी प्रशासन व शासनाला दिला.
या जनआक्रोश मोर्चामध्ये
▪️ रोशन कुळेंवर अन्याय करणाऱ्या अवैध सावकारांवर व मानवी अवयव तस्करांवर कठोर कारवाई..
▪️ रोशन कुळेंना शासकीय नोकरी…
▪️ स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची तात्काळ अंमलबजावणी…
▪️ शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी व सन्माननीय पेन्शन…
▪️ शेतमालाला कायदेशीर हमीभाव…
▪️ गोसेखुर्द धरणाच्या उजव्या कालव्याचे पाणी उन्हाळी धान पिकासाठी तातडीने सोडावे…
या निर्णायक मागण्या मांडण्यात आल्या…
“स्वामिनाथन आयोग लागू करा”, “शेतकरी विरोधी सरकारचा करायचं काय खाली डोके वरती पाय”,“शेतकऱ्यांना न्याय द्या”, “हिटलरशाही सरकारचा निषेध असो”, “शेतकरी एकता जिंदाबाद”, “शेतकऱ्यांच्या हक्क मे जनता मैदान मे”, “इन्कलाब जिंदाबाद”, “भारत माता की जय” अशा विविध घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला.
या मोर्चाच्या यशस्वी आयोजनासाठी विनोद झोडगे, गिरीश नवघडे, राहुल पांडव, विनोद नवघडे प्रशांत डांगे, राहुल भोयर, यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले. शेतकरी बांधव व परिसरातील नागरिकांच्या अभूतपूर्व सहकार्यामुळे हा मोर्चा ऐतिहासिक ठरला.
हा मोर्चा केवळ आंदोलन नव्हता, तर शेतकऱ्यांच्या अस्तित्वासाठीचा संघर्षाचा आक्रोश होता. आज जनता जागी झाली आहे, हेच या जनआक्रोश मोर्चाचे सर्वात मोठे यश आहे. आज शांत बसलो तर उद्या हीच वेळ आपल्यावर येईल, ही जाणीव ठेवून नागरिक रस्त्यावर उतरले. आता शासन–प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन तात्काळ ठोस निर्णय घ्यावेत, अन्यथा हा जनआक्रोश भविष्यात अधिक तीव्र रूप धारण करेल, असा स्पष्ट इशारा या मोर्चातून देण्यात आला.



