बाळासाहेब सुतार
नीरा नरसिंहपुर प्रतिनिधी
यावर्षी थंडी मोठ्या प्रमाणावर असल्याने वातावरणामध्ये गारवा निर्माण झाला आहे. गारव्यामुळे व थंडीच्या वाढत्या कडाक्यामुळे गव्हाच्या उत्पादनामध्ये वाढ होणार असल्याचे मत अनेक शेतकऱ्यांनी व्यक्त केले. सध्या गव्हाच्या पेरणीचा हंगाम अजुनही सुरू असून अनेक ठिकाणी गव्हाचे पिकाच्या पेरणी करण्यात येत आहे.
शेतकऱ्यांचा ऊस साखर कारखान्यांना गाळपास गेल्यानंतर शेतामध्ये गव्हाची पेरणी लवकर करण्यात आली. त्यामुळे गव्हाचे पीक जोमात आले आहे. गव्हासाठी वाढती थंडी पोषक असल्याने गहू पीक चांगल्या प्रकारे उगवून आले आहे. आणि पिकाची वाढ देखिल चांगली होत आहे.
गहू पिकाची मोठी वाढ झाल्याने चांगले उत्पादन मिळणार याची आशा शेतकऱ्यांना लाभलेली आहे.
साधारण एक एकरासाठी नांगरणी, कल्टीवेटर अशाप्रकारे शेतीची मशागत केली जाते व त्यानंतर ४० ते ६० किलो गहू पेरणीसाठी लागतो. गहू उगवल्यानंतर तन नाशक फवारणी केल्यानंतर पिकाची चांगली वाढ होण्यासाठी रासायनिक खत १०.२६.२६ दोन बॅग त्याचबरोबर युरिया दोन बॅग अशाप्रकारे शेताच्या मशागतीपासून ते गहू शेतकऱ्यांच्या हातात पडेपर्यंत खर्च ९ ते १० हजार रुपये एवढा येतो.
थंडीमुळे गव्हाच्या पिकांचे उत्पादनात वाढ होऊन १५ क्विंटल ऐवजी १८ ते २० किंटल उत्पादन मिळू शकेल. त्यामुळे शेतकऱ्याला या गहु पिकाच्या उत्पादनातून खर्च वजा जाता एकरी ४० ते ५० हजार रुपये उत्पन्न मिळणार आहे. वाढती थंडी ज्याप्रमाणे गहू पिकासाठी पोषक आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना नक्कीच गव्हाच्या उत्पन्नामधून फायदा होईल.



