दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी : अलंकापुरी फोटोग्राफर असोसिएशनच्या वतीने आळंदी नगरपरिषदेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे तसेच नगरसेवकांचा सन्मान सोहळा उत्साहात पार पडला. लोकशाही प्रक्रियेतून निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना समाजातील विविध घटकांकडून मिळणारा सन्मान ही जबाबदारी अधिक वाढवणारी बाब असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
कार्यक्रमात नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे व सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. छायाचित्रकार हे समाजातील घडामोडी जतन करणारे मूक साक्षीदार असून त्यांच्या कार्यामुळे सामाजिक व सांस्कृतिक इतिहास जिवंत राहतो, असे मत नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे यांनी व्यक्त केले.
नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे यांनी मनोगतात सांगितले की, “आळंदी हे केवळ तीर्थक्षेत्र नसून एक वेगळी ओळख असलेले शहर आहे. या शहराचा विकास करताना सर्व घटकांना विश्वासात घेऊन पारदर्शक व लोकाभिमुख कारभार करणार आहोत. शहराच्या सकारात्मक प्रतिमेसाठी छायाचित्रकारांचे योगदान महत्त्वाचे असून त्यांच्या सहकार्यानेच विकासकामांना योग्य दिशा मिळेल.”
यावेळी नगरसेवकांनीही शहराच्या विकासासाठी एकत्रितपणे काम करण्याचा संकल्प व्यक्त केला. कार्यक्रमास अलंकापुरी फोटोग्राफर असोसिएशनचे पदाधिकारी, सदस्य, छायाचित्रकार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन असोसिएशनच्या वतीने विठ्ठल शिंदे यांनी केले.



