अबोदनागो एस.चव्हाण
जिल्हा प्रतिनिधी अमरावती
दखल न्युज भारत
अमरावती शहरातंर्गत शिवणगाव फत्तेपुर परिसरातील उड्डाणपुलावर मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात अंदाजे ६० वर्षीय अज्ञात महिलेचा मृत्यू झाला आहे.या प्रकरणी नांदगाव पेठ पोलिस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,उपनिरीक्षक प्रदीप श्रीकृष्ण शहाणे (वय ५६, रा. नांदगाव पेठ,अमरावती) हे ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री ९ वाजल्यापासून १ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ९ वाजेपर्यंत नाईट ड्युटीवर होते.
त्या दरम्यान,ते पोलीस शिपाई क्र. ७०४ यांच्यासह पोलीस वाहनातून परिसरात पेट्रोलिंग करीत होते.दरम्यान,१ नोव्हेंबर २०२५ रोजी पहाटे सुमारे २.३० वाजता “डायल ११२” वरून कॉल प्राप्त झाला की,शिवणगाव फत्तेपुरजवळील उड्डाणपुलावर अपघात झाला आहे.
त्यानंतर त्यांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचून पाहणी केली.तेथे सुमारे ६० वर्षीय एका अनोळखी महिलेचा मृतदेह रस्त्यावर आढळून आला.तिचे वर्णन असे आहे — रंग सावळा,केस काळे-पांढरे मिसळलेले,अंगात निळ्या रंगाचा स्पोर्ट पॅन्ट,तपकिरी (ब्राउन) रंगाचे मळके स्वेटर,पांढऱ्या रंगाचा दुपट्टा,रंगीबेरंगी सँडल व गळ्यात पांढऱ्या मोत्याची माळ.
तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती व रस्त्यावर रक्त सांडलेले होते.पोलिसांनी तत्काळ महिलेचा मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केला असता,तेथील डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले.
मृत महिला अनोळखी असल्याने तिचे प्रेत शवविच्छेदनगृहात तीन दिवसांसाठी ठेवण्यात आले आहे आणि तिच्या नातेवाईकांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
प्राथमिक तपासात असे स्पष्ट झाले आहे की,अज्ञात वाहनचालकाने त्या महिलेला धडक दिली व कोणतीही मदत न करता घटनास्थळावरून पसार झाला.या प्रकरणी उपनिरीक्षक प्रदीप शहाणे यांच्या फिर्यादीवरून नांदगाव पेठ पोलिस ठाण्यात अप. क्र. ३८७/२०२५ अंतर्गत कलम २८१,१०६ (१) बीएनएस व मोटार वाहन कायदा कलम १३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



