भाविकदास करमनकर
तालुका प्रतिनिधी धानोरा
धानोरा तालुक्यातील रांगी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक पीएम श्री.शाळेच्या परिसरातील गटसाधन केंद्राच्या इमारतीवर चिंचेच्या झाडाची मोठी फांदी कोसळून छतावरील पाण्याची टाकी जळाल्याची घटना घडली.
या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी शाळा परिसरातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
प्राप्त माहितीनुसार,जिल्हा परिषद पीएम श्री शाळेच्या परिसरात गटसाधन केंद्राची इमारत असून,त्यालगत स्वच्छतागृहावर पाण्याची टाकी बसविण्यात आली होती.या परिसरात चिंचेचे एक मोठे झाड होते.अज्ञात व्यक्तीने या झाडाला आग लावल्याचा आरोप करण्यात येत आहे.आग लागल्यामुळे झाडाची मोठी फांदी अचानक कोसळली.यामुळे परिसरातील पाण्याची टाकी जळून नुकसान झाले.
घटना घडली त्यावेळी परिसरात विद्यार्थी किंवा कर्मचारी उपस्थित नसल्याने मोठा अनर्थ टळला.या घटनेमुळे शाळा परिसरातील धोकादायक झाडांचे सर्वेक्षण करून आवश्यक ती उपाययोजना करावी,तसेच संबंधित प्रकाराची चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करावी,अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.



