Home Crime गर्दीच्या बस प्रवासात महिलेला ₹६.४० लाखाचे सोन्याचे दागिने गमवावे लागले… 

गर्दीच्या बस प्रवासात महिलेला ₹६.४० लाखाचे सोन्याचे दागिने गमवावे लागले… 

अबोदनगो.एस.चव्हाण

अमरावती जिल्हा प्रतिनिधी

        दखल न्युज भारत 

अमरावती :- गर्दीच्या बस प्रवासादरम्यान एका महिलेला तब्बल सहा लाख चाळीस हजार रुपये किमतीचे ६४ ग्रॅम सोन्याचे दागिने गमवावे लागले. ही घटना १ नोव्हेंबर रोजी दुपारी घडली असून, या प्रकरणी गाडगेनगर पोलिस ठाण्यात अज्ञात महिलेविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

           पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला आपल्या पतीसह त्यांच्या मुलीकडे जाण्यासाठी चांदुरबाजार येथून अमरावतीकडे जाणाऱ्या बसमध्ये प्रवास करत होत्या. ही बस अत्यंत गर्दीची होती. प्रवासादरम्यान त्यांच्या आजूबाजूला काही अनोळखी महिला उभ्या होत्या. बस शेगाव नाका आणि पंचवटी परिसरातून जात असताना काही महिला खाली उतरल्या.

          त्याच वेळी फिर्यादीला त्यांच्या मोबाईलवर फोन आला. त्यांनी आपली पर्स हातात घेतली असता पर्सची चैन उघडी असल्याचे त्यांना दिसले. पुढे तपास केला असता, पर्समधील दुसरी चैनदेखील उघडी असल्याचे आढळून आले.

         फिर्यादीने तत्काळ आपल्या बॅगमधील लहान पर्स तपासली असता ती गायब असल्याचे लक्षात आले. या लहान पर्समध्ये सोन्याचे एकूण ६४ ग्रॅम दागिने होते. त्यामध्ये सोन्याची पट्टी पोत ४० ग्रॅम (किंमत अंदाजे ₹४,००,०००), सोन्याचे मंगलसूत्र २० ग्रॅम (किंमत ₹२,००,०००), सोन्याची लहान अंगठी १ ग्रॅम (₹१०,०००), सोन्याचे धम्मचक्र १ ग्रॅम (₹१०,०००) आणि दोन जोड सोन्याचे कानातले २ ग्रॅम (₹२०,०००) असे दागिने होते.

         या सर्व दागिन्यांची एकूण किंमत सुमारे ₹६,४०,००० इतकी असल्याचे फिर्यादीने पोलिसांना सांगितले. बसमध्ये गर्दी असल्याने आणि अनेक अनोळखी महिला आजूबाजूला असल्याने कोणत्या व्यक्तीने पर्स चोरली हे निश्चित सांगता आले नाही.

          फिर्यादीच्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिस ठाण्यात कलम ३७९ अन्वये अज्ञात महिलेविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.