नवसंजीवनी,मिशन मेळघाट जिल्हास्तरीय आढावा बैठक…. — कुपोषण मुक्तीसाठी शासकीय यंत्रणांनी समन्वयाने काम करावे… – जिल्हाधिकारी सौरभ कटियार…

दखल न्युज भारत

मेळघाट प्रतिनिधी

अबोदनगो चव्हाण

 

चिखलदरा-:

        नवसंजीवनी योजनेतून मेळघाटातील प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी समन्वयाने काम करावे.कुपोषण निर्मूलनासाठी समुदाय व उपचार केंद्र,पोषण पुनर्वसन केंद्र,ग्राम बालविकास केंद्रांची भूमिका महत्त्वपूर्ण आहे.

         कुपोषण मुक्तीसाठी आरोग्य आणि महिला व बाल कल्याण विभागाने शासकीय योजनांची अंमलबजावणी समन्वयाने करावी,असे निर्देश जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी आज दिले. 

         “नवसंजीवनी,मिशन मेळघाट व गाभा समितीची जिल्हास्तरीय आढावा बैठक चिखलदऱ्यातील वन प्रशिक्षण संस्थेच्या सभागृहात झाली,त्यावेळी ते बोलत होते.

         जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविशांत पंडा, जिल्हाधिकारी तथा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी रिचर्ड यान्थन, उपवन संरक्षक डॉ. सुमंत सोळंके यांच्यासह भारतीय प्रशासकीय सेवेतील प्रशिक्षणार्थी अधिकारी तसेच विविध विभागांचे अधिकारी व स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. 

          श्री.कटियार म्हणाले की,कुपोषण निर्मूलनासाठी सुक्ष्म नियोजन तसेच बालकांची दैनंदिन तपासणी करण्यात यावी. बालकांना वेळीच योग्य उपचार मिळवून द्यावे.एकही बालक उपचारापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी.

        पोषण आहार योजनांची भरीव अंमलबजावणी करावी. कुपोषण मुक्तीसाठी आरोग्य विभाग आणि महिला व बाल विकास विभागामार्फत विविध योजना राबविण्यात येतात. या योजनांचा योग्य मेळ साधल्यास त्याची परिणामकारकता अधिक वाढेल.यासाठी दोन्ही विभागाने दर महिन्याला बैठक घेऊन पुढील कार्यपद्धती निश्चित करावी,अशी सूचना त्यांनी यावेळी दिली.

         स्वयंसेवी संस्था प्रतिनिधींच्या मागण्या यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी जाणून घेतल्या व त्यावर कार्यवाहीचे निर्देश प्रशासनाला दिले. 

      मेळघाटात कुपोषण मुक्ती व आरोग्य जनजागृतीच्या दृष्टीने जिल्हा ग्रामीण आरोग्य यंत्रणेने महिला व बाल विकास विभागाच्या समन्वयातून राबविलेले ‘मिशन 28’ प्रभावी ठरले आहे. या मोहिमेत आरोग्य अधिकारी,वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेविका,आशा सेविका, अंगणवाडी सेविका यांच्या पाड्यापाड्यांवर भेटी वाढवून प्रभावी जनजागृती व पाठपुरावा करण्यात आला. 

         या मोहिमे दरम्यान उपचाराबरोबरच समुपदेशन व जनजागृती हा घटक महत्त्वपूर्ण ठरला.या मोहिमेमुळे घरी प्रसुतीचे प्रमाण कमी झाले.या मोहिमेचे यश लक्षात घेऊन याच धर्तीवर पुढील वाटचाल करावयाची असल्याचे श्री. कटियार यावेळी म्हणाले. 

        दुर्गम भागातील नादुरुस्त रस्त्यांची त्वरित सुधारणा करावी. जन्म,मृत्यू नोंदणी प्रमाणपत्र नागरिकांना सुलभपणे मिळण्यासाठी विशेष अभियान आयोजित करावे. आदिवासी विभागातील नागरिकांची नावे निवडणूक यादीत टाकण्यासाठी त्यांना सर्व कागदपत्रे उपलब्ध करुन द्यावे.शासनाने प्रत्यक्ष त्यांच्या दारी जाऊन त्यांना जागेवरच दाखले उपलब्ध करुन द्यावे. 

        पावसाळ्यात ज्या गावांचा संपर्क तुटतो अशा ठिकाणी बांधकाम विभागाने त्वरित कारवाई करावी. चिखलदरा व धारणी या तालुक्यांमध्ये नरेगातून मंजूर रस्त्यांची कामे करण्यात येत आहेत. ती कामे पुढेही चालू ठेवावीत. 

      मेळघाटामध्ये कृषी विभागामार्फत पोकरा योजनेचा दुसरा टप्पा सुरु करण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळावा यासाठी प्रयत्न करावे. कृषी विभागामार्फत मेळघाटात पौष्टिक तृणधान्य लागवडीसाठी प्रोत्साहन द्यावे. तृणधान्याचे आरोग्य विषयक फायदे, मूल्यवर्धन, प्रक्रिया, नव उद्योगातील व्यावसायिक दृष्टीकोन वाढविण्यासाठी जनजागृती करावी. यंदाचे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून साजरे करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर येथील शेतकऱ्यांना प्रोत्साहन द्यावे. 

       मेळघाटात वेळोवेळी आरोग्य तपासण्या, पोषण आहार वितरण, उपचार, जनजागृती व इतर आवश्यक कामे विविध विभागाने समन्वयाने करावी. बालकांना योग्य पोषण आहार देण्यासाठी त्यांच्या पालकांचेही समुपदेशन करावे. पाणीपुरवठा, शिक्षण, ग्रामविकास, मनरेगा, पुरवठा, वनविभाग, जलसंधारण विभाग, महावितरण, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग, परिवहन विभाग, उद्योग विभागांचा जिल्हाधिकारी यांनी यावेळी आढावा घेतला.