शेकडो माजी विद्यार्थ्यांचे जीवनात अधोरेखीत झाला “१४ मे”… — ३० वर्षानंतर झाली होती ‘पुनर्भेट’.. “स्नेहछटा”  प्रा.महेश पानसे.

         नेवजाबाई हितकारिणी हायस्कूल नवेगाव पांडव येथील १९७६ ते २००० पर्यंत शिकलेले विद्यार्थी व विद्यार्थिनी यांच्या पुनर्भेटीचा मधूरयोग १४ मे २०२३ ला घडून आला.एकंदरीत १४ मे हा दिवस शेकडो माजी विद्यार्थी,विद्यार्थिनीं यांच्या जीवनातील अविस्मरणीय दिवस म्हणता येईल. 

        ३५ ते ४० वर्ष कालखंडातील कधीकाळी मित्र पण आता अनोळखी झालेल्या ३०० वर मित्र,मैत्रिणींना आमोरासमोर आणून अपूर्व नेत्रसुख देणारा १४ मे हा दिवस कसा काय विसरता येईल.

          ओठावर मिसरूट नसताना ते विद्याथीं एकमेकांना सोडून मार्गस्थ झाले,वितभर काळयाभोर केसांची छोटीसी वेणी असलेल्या निरागस मुली संसारात गुंतल्यात.सारे एकमेकांच्या आठवणीत तर होते पण अनोळखी झालेत.

          मात्रं ११ मे २०२३ ला ने.हि.विद्यालयात आयोजीत या माजी विद्यार्थी मेळाव्यात कुणी २५,३० तर कुणी ३५ वर्षा नंतर ऐकमेकांसमोर आलेत.सारे गदगद झालेत.शाळेतील त्या जुन्या आठवणी टवटवीत झाल्यात.

         २५० ते ३०० माजी विद्यार्थी व विद्यार्थिनी आपल्या १२ ते १६ वर्षात हरवले. दोन ते तिन तपानंतर आपल्या बदललेल्या अनोळखी रूपातून बालवयात आणणारा,आनंदाश्रूंना वाट मोकळी करून देणारा तो दिवस १४ मे २०२३.

      ने.हि.विदयालयात आम्हाला घडविणारे शिक्षकही आपल्या विद्यार्थ्याना आशीर्वाद देत या मधुर मिलन सोहळ्याचे साक्षीदार बनून उपस्थित राहीले ही फार अभिमानाची बाब होती. 

         आमचे शिक्षक बरेचसे ७५,८० पार केलेले,वयोवृद्ध पण आपल्या माजी विद्यार्थी व विद्यार्थिनीसोबत त्याच प्रेमाने,आपुलकीने रमले व चिराठवण सोबत घेऊन गेले. 

        माजी विद्यार्थी मेळाव्यातील तिच शाळा,तेच विद्यार्थी, सोबतीला आमचे तेच शिक्षक. किती आनंददायी,चिरस्मरणीय दिवस होता.खरे सांगायचे म्हणजे आम्हा शेकडो माजी विद्यार्थ्याचे आयुष्यातला मैत्रीदूत ठरला आहे हा दिवस.

      मैत्रीचा पुनर्जन्म साकारणारा १४ मे या शेकडो विदयार्थी व विद्यार्थिनींसाठी अविस्मरणीय ठरला आहे.

        संपूर्ण विदर्भात नव्हे संपूर्ण राज्यात ३०,३५ वर्ष एकमेकांपासून दुरावलेल्या ३०० ते ३५० माजी शालेय विद्यार्थ्याना भेटविणारा असा योग आला नसेल कदाचीत. 

        या भव्य व अविस्मरणीय माजी विद्यार्थी व विद्यार्थिंनी मेळाव्याचे आयोजक जरी आम्ही असलो तरी मात्रं ज्या सजगतेने ने.हि.शाळेने तत्परता व तयारी केली ती भावनिक होती.यात कृत्रिमता अजिबात नव्हती.अशी शाळा,संस्था दुमिंळ असते.इथली शिस्तीचे न्यारी आणी आमचे सौभाग्य इथे आम्ही घडलो.

          माजी विद्यार्थी मेळावा होऊन वर्ष लोटले.मात्र आता सारे माजी विद्यार्थी व विद्यार्थिंनी आंतरीक जवळीक साधली आहे. सारे एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होत आहेत हिच तर या मेळाव्याची यतार्थता आहे.

       या मेळाव्याचे साक्षीदार ठरले होते ना.विजय वडेट्टीवार, माजी मंत्री शोभाताई फडणविस, शिक्षक आमदार अडबाले सर, ने.हि.शिक्षण संस्थेचे सचिव अशोक भैयाजी सारे कसे आपला व्याप,राजकारण बाजूला सारून अत्यंत कुतूहलाने या मेळाव्याचा आनंद घेऊन,बालगप्पांमध्ये रमले हे विशेष.