राकेश चव्हाण
कुरखेडा तालुका प्रतिनिधी
कोरची व कुरखेडा तालुक्यात नवीन क्रीडा संकुल मंजूर करण्यात यावेत तसेच देसाईगंज व आरमोरी येथील विद्यमान क्रीडा संकुलांचे आधुनिकीकरण करून खेळाडूंना अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, याबाबत आमदार रामदासजी मसराम यांनी जिल्हा क्रीडा अधिकारी भास्कर घाटाळे यांच्यासोबत जनसंपर्क कार्यालय, वडसा येथे सविस्तर चर्चा केली.
बैठकीदरम्यान ग्रामीण व आदिवासी भागातील युवक-युवतींना दर्जेदार क्रीडा सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी कोरची व कुरखेडा येथे नवीन क्रीडा संकुल उभारण्याची आवश्यकता आमदार मसराम यांनी अधोरेखित केली.
तसेच देसाईगंज व आरमोरी येथील क्रीडा संकुलांमध्ये आधुनिक क्रीडा साहित्य, खेळाडूंसाठी प्रशिक्षण सुविधा, मैदानांचे उन्नतीकरण आणि आवश्यक पायाभूत सुविधा विकसित करण्याची मागणी त्यांनी केली.
जिल्हा क्रीडा अधिकारी भास्कर घाटाळे यांनी या मागण्यांबाबत सकारात्मक प्रतिसाद देत आवश्यक प्रस्ताव शासनाकडे लवकरात लवकर सादर करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन दिले.



